खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर येताच गुन्हेगाराची मिरवणूक; पोलिसांनी 'असा' केला पाहुणचार
By सुमित डोळे | Published: August 17, 2024 07:59 PM2024-08-17T19:59:00+5:302024-08-17T19:59:27+5:30
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्लेखान्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याचा येथेच्छ ‘पाहुणचार’ करून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
छत्रपती संभाजीनगर : खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीची गावगुंडाच्या टोळक्याने चक्क कारवर बसवून मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांपर्यंत व्हिडीओ पोहोचल्यानंतर या गुंडाचा पोलिसांनी येथेच्छ ‘पाहुणचार’ केला. कारवर बसून मिरवलेला दादा थेट ठाण्यात गुडघ्यांवर येऊन माफी मागताना दिसला. अकीब ऊर्फ गोल्डन कुरेशी युनूस कुरेशी (२३, रा. सिल्लेखाना) असे आरोपीचे नाव आहे.
१६ जानेवारी २०२२ रोजी मिसारवाडीत हसन साजीद पटेल (२५) या तरुणाची १२ जणांनी मिळून तब्बल ५६ वार करून निर्घृण हत्या केली होती. सिडको पोलिसांनी अकीबसह १० आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून अकीब जामिनासाठी प्रयत्न करत होता. जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयाने देखील त्याला जामीन नाकारल्यानंतर त्याचे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथे त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी सकाळी तो हर्सूल कारागृहाबाहेर आला. मात्र, सिल्लेखान्यात पोहोचताच २० ते २५ दुचाकी, चारचाकींसह त्याची मिरवणूक काढण्यात आली. एका कारवर अकीबसह ६ जण बसले होते. याचा व्हिडीओ तयार करून त्यांनी तो सोशल मीडियावर देखील पोस्ट केला.
क्रांती चौक ठाण्यात गुन्हा
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्लेखान्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याचा येथेच्छ ‘पाहुणचार’ करून क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. अंमलदार इरफान खान यांच्या तक्रारीवरून अकीबसह जरार कुरेशी, शाहरुख कुरेशी, इरफान कुरेशी ऊर्फ सूर्या, अबरार कुरेशी यांच्यावर या मिरवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अकीबवर हत्येसह बेगमपुरा पोलिस ठाण्यात देखील एका गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.