कुपोषणाला आळा घालण्यासाठी होणार कुशल मनुष्यबळ निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:12 PM2019-06-24T22:12:33+5:302019-06-24T22:12:51+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मास्टर आॅफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम २०१९-२० पासून सुरू करण्यात आला आहे.
औरंगाबाद : कुपोषण आणि अयोग्य आहार पद्धतीमुळे होणाऱ्या रोगांना आळा घालण्यासाठी आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मास्टर आॅफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम २०१९-२० पासून सुरू करण्यात आला आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते सोमवारी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. रेषाकिरण शेंडे, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. प्रभा खैरे, डॉ. विनोद मुंदडा, डॉ. तृप्ती गुजराथी, डॉ. वैजयंती हरदास, डॉ. चिंतले, डॉ. कल्याणकर, डॉ. अणदूरकर, डॉ. रझवी आदींची उपस्थिती होती.
यावेळी जन औषधवैद्यकशास्राचे विभागप्रमुख डॉ. मोहन डोईबळे म्हणाले, कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक असल्यामुळे हे चित्र बदलायचे असेल, तर सार्वजनिक आरोग्य आणि पोषण आहार या विषयाचे परिपूर्ण प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांची गरज आहे. हे लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले.
डॉ. येळीकर म्हणाल्या, माता, बाल तसेच वृद्धावस्थेत कुपोषणामुळे होणारे संभाव्य आजार, धोके, यावर भर देऊन हा अभ्यासक्रम ग्रामीण आणि शहरी आरोग्य या दोन्हीकरिता अत्यंत आवश्यक आहे.
राज्यात १२० जागा
या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षांचा आहे. यामध्ये औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २० जागा असून, त्यापैकी १७ जागा भरण्यात आल्या आहेत, तर राज्य स्तरावर सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२० जागा असणार आहेत.