राजीनाम्याच्या विरोधासाठी प्राध्यापक, विद्यार्थी एकवटले
By Admin | Published: July 14, 2017 12:35 AM2017-07-14T00:35:56+5:302017-07-14T00:43:26+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळ व फॉरेन स्टुडंट सेलचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांच्याकडून दोन्ही पदांचा राजीनामा घेण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद गुरुवारी विद्यापीठात उमटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळ व फॉरेन स्टुडंट सेलचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांच्याकडून दोन्ही पदांचा राजीनामा घेण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद गुरुवारी विद्यापीठात उमटले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक- अधिकाऱ्याचा राजीनामा किरकोळ कारणावरून घेण्याचा पायंडा विद्यापीठाच्या विकासासाठी धोकादायक असून, डॉ. खान यांचे घेतलेले राजीनामे परत करण्याची मागणी प्राध्यापक तसेच सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी केली आहे. यासंबंधी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे निवेदनही सादर करण्यात आले.
विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. या घडलेल्या प्रकारामुळे प्राध्यापक, विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कल्याण शेजुळे, सचिव डॉ. सुनील नरवडे यांच्यासह इतरांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेत या प्रकरणावर चर्चा केली. दोन्ही प्राध्यापक हे संघटनेचे सदस्य आहेत. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याला अशा पद्धतीने पदावरून काढणे योग्य नसल्याचे कुलगुरूंना प्राध्यापक संघटनेने स्पष्ट केले. दुपारनंतर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदन देत तीव्र संताप व्यक्त केला. डॉ. खान यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांना एकही पुरावा देण्यात आलेला नाही. प्रत्यक्षदर्शीसुद्धा आरोपांचे खंडन करत असताना राजीनामे कसे घेण्यात आले, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपिस्थत केला. प्रामाणिक व कार्यक्षम प्राध्यापकांचा राजकीय बळी जात असेल तर विद्यार्थी संघटना गप्प बसणार नसल्याचा इशाराही निवेदनाद्वारे विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. या निवेदनावर एसएफआयचे सुनील राठोड, रखमाजी कांबळे, सत्यजित मस्के, लोकेश कांबळे, रेखा काकडे, प्राजक्ता शेटे, अभिमान भोसले, नितीन वाव्हळे, चंद्रकांत डमाले यांच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कुलगुरूंची भूमिका संशयास्पद?
डॉ. खान यांच्यावर पक्षपाती पद्धतीने कारवाई केली आहे. आतापर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठात धर्मावरून कोणावरही आरोप करण्यात आलेले नव्हते. मात्र, इंग्रजी विभागातील प्रकरणात धर्म घुसडण्यात आला आहे. याला काही प्रभारी अधिकारी जबाबदार असून, यात कुलगुरूंची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप निवेदन देतेवेळी सत्यजित मस्के या विद्यार्थ्याने केला. यावरून विद्यार्थी आणि कुलगुरू यांच्यातही काही काळ तणावपूर्ण चर्चा झाली.
हे आहे मूळ कारण
विद्यापीठातील इंग्रजी विभागप्रमुखांनी डॉ. मुस्तजीब खान यांना आॅनलाइन कोर्स असलेल्या ‘मूक’च्या बैठकीला विभागाचा प्रतिनिधी म्हणून पाठवले होते.
या बैठकीनंतर डॉ. खान यांनी बैठकीतील घटनाक्रमाची रिपोर्टिंग विभागप्रमुखांना केली. यावर विभागप्रमुखांनी डॉ. खान यांनाच त्या कोर्सचे इन्चार्ज होण्याच्या सूचना केल्या. मात्र, अगोदरच विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांचे पालकत्व असल्यामुळे नवीन जबाबदारीला न्याय देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विभागातील विद्यार्थ्यांच्या तासिका सोडता इतर काम करण्यास वेळ मिळणार नसल्याचे डॉ. खान यांनी विभागप्रमुखांना सांगितले.
यासाठी हवे तर कुलगुरूंचे पत्र आणून देण्याची तयारी दर्शवली. मात्र, विभागप्रमुखांनी ते मान्य केले नाही. यावरून दोघांत किरकोळ वाद झाला. या बाचाबाचीला काहींनी वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. कुलगुरूंनाही हे प्रकरण येत्या अधिवेशनात उपस्थित करण्याची भीती घालून देण्यात आली.
यामुळे कुलगुरूंनी डॉ. खान यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. शेवटी डॉ. खान यांनी नाहक बळी जाण्यापेक्षा आनंदाने राजीनामा देण्याचा मार्ग निवडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.