विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारा प्राध्यापक अशोक बंडगर निलंबित
By राम शिनगारे | Published: April 26, 2023 01:56 PM2023-04-26T13:56:30+5:302023-04-26T13:57:51+5:30
विद्यार्थिनीस वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन जात केला अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : पेइंग गेस्ट म्हणून घरी राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल असलेला प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर यास कुलगुरूंच्या आदेशाने विद्यापीठ प्रशासनाने आज तडकाफडकी निलंबित केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकासह त्याच्या पत्नीच्या विरोधात विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री नोंदविला आहे. आरोपींमध्ये डॉ. अशोक गुराप्पा बंडगर व त्याची पत्नी पल्लवी अशोक बंडगर (रा. विद्युत कॉलनी, बेगमपुरा) यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कुलगुरूंच्या आदेशाने विद्यापीठ प्रशासनाने प्रा. बंडगर यास निलंबित केले. दरम्यान, आरोपी प्राध्यापक, त्याची पत्नी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण
प्रा. अशोक बंडगर याने एका विद्यार्थिनीस विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेला. घरी त्याच्या पत्नीनेही मुलीसारखी काळजी घेण्याचे आश्वासन दिले. जुन २०२२ मध्ये बंडगरने अनेकवेळा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. जुलै २०२२ मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने तिच्यासोबत बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्तीने शारीरिक संंबंध ठेवले. जानेवारी २०२३ मध्ये हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस पीडितेने सांगितला. तेव्हा तिने सर्व मला मान्य आहे. तु आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचेही सांगितले. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.