जगातील सर्वोत्तम संशोधकांमध्ये औरंगाबादच्या प्राध्यापकांची नोंद
By | Published: December 7, 2020 04:00 AM2020-12-07T04:00:03+5:302020-12-07T04:00:03+5:30
औरंगाबाद : जगातील रसायनशास्त्राच्या संशोधकांमध्ये येथील वाय. बी. चव्हाण फार्मसी कॉलेजचे सहयोगी प्रा. डॉ. जयप्रकाश नवनाथ संगशेट्टी यांचा समावेश ...
औरंगाबाद : जगातील रसायनशास्त्राच्या संशोधकांमध्ये येथील वाय. बी. चव्हाण फार्मसी कॉलेजचे सहयोगी प्रा. डॉ. जयप्रकाश नवनाथ संगशेट्टी यांचा समावेश झाला असून या माध्यमातून पुन्हा एकदा औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार चमकले आहे.
कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने विविध विषयांत संशोधन करणाऱ्या सन २०१९ मधील सर्वोत्तम संशोधकांची यादी ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये ‘मेडिसीनल बायोमॉलिक्युलर केमिस्ट्री’ या विषयात पहिल्या दोन टक्के उत्कृष्ट संशोधकांमध्ये औरंगाबादच्या प्रा. डॉ. जयप्रकाश संगशेट्टी यांचा समावेश आहे. यासाठी डॉ. संगशेट्टी यांनी सादर केलेला अभ्यासपूर्ण शोधनिबंध व त्यामध्ये त्यांनी दिलेले संदर्भ, उतारे व उपयुक्त माहितीचा विचार केला गेला आहे.
डॉ. संगशेट्टी हे औरंगाबादच्या ‘नॅक’ मानांकन ‘अ’ श्रेणी प्राप्त वाय. बी. चव्हाण फार्मसी कॉलेजच्या गुणवत्ता आश्वासक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली आहे. डॉ. संगशेट्टी यांनी चार पेटंट मिळविले आहेत. त्यांचे आतापर्यंत दोनशेहून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ‘जर्नल्स’ मधून प्रकाशित झाले असून त्यांच्या संशोधनाला ३३०० ‘सायटेशन क्रिडीट’ मिळाले आहेत.
डॉ. संगशेट्टी यांनी औषधनिर्माण क्षेत्राशी संबंधित आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय ‘नेचर-स्प्रिनजर अँड बेनथॅम’ ह्या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, त्यांना पूर्वी ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजी’ या विभागाकडून तरुण संशोधक म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यांनी ‘डीएसटी’, ‘यूजीसी’ तसेच ‘एसईआरबी’ या संस्थांचे विविध संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. त्यांना सन २०१५ मध्ये ‘एलसेव्हीयर’चा उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार मिळालेला आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.