विपूल ग्रंथसंपदेचे धनी : डॉ. पानतावणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:35 PM2018-03-27T14:35:42+5:302018-03-27T14:40:59+5:30
आंबेडकरी विचारधारा, जाणिवेचे समर्थ वाहक, मराठीतील कवी, विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि अस्मितादर्शकार, पद्मश्री डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (८१) यांचे सोमवारी मध्यरात्री औरंगाबादेत निधन झाले व साहित्यविश्वासह समाजमन हेलावले.
औरंगाबाद : आंबेडकरी विचारधारा, जाणिवेचे समर्थ वाहक, मराठीतील कवी, विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि अस्मितादर्शकार, पद्मश्री डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (८१) यांचे सोमवारी मध्यरात्री औरंगाबादेत निधन झाले व साहित्यविश्वासह समाजमन हेलावले.
अल्पपरिचय
डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ मध्ये नागपुरात झाला. नागपुरातील डीसी मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक आणि नवयुग विद्यालय व पटवर्धन हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण झाले. १९५६ मध्ये मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. आणि एम.ए. केले. पुढे ते मराठवाडा विद्यापीठात दाखल झाले व येथून त्यांनी मार्गदर्शकाशिवाय पीएच.डी. पदवीपूर्ण केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ यावर त्यांनी संशोधन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयात ते १९६५ मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात १९७७ मध्ये मराठीचे प्राध्यापक व पुढे मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून सेवा बजावत असतांनाच ते सेवानिवृत्त झाले.
विशेष म्हणजे मॅट्रीक झाल्यावर त्यांच्या लेखन प्रतिभेचे दर्शन होऊ लागले. ‘प्रतिष्ठान’ नियतकालीकेतून प्रारंभी त्यांनी लेखनास सुरूवात केली. पुढे विविध विषयावर त्यांनी वैचारिक, समीक्षात्मक, ललित असे विपूल लेखन केले. दलित साहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास होता. तत्कालीन प्रस्थापित पत्रिका नव्या व दलित लेखकांना विशेष संधी देत नसल्याचे पाहून त्यांनी १९६७ मध्ये नवलेखकांसाठी, दलित साहित्य व दलित चळवळीला वाहिलेले अस्मितादर्श हे त्रैमासिक सुरू केले. अस्मितादर्शचे संस्थापक संपादक होते. त्यातून नवलेखकांना मंच उपलब्ध करून दिला. त्यातून पुढे अनेक लेखक तयार झाले. दलित साहित्यांची एक पिढीच उभी राहिली. अस्मितादर्शतर्फे घेतले जाणारे लेखक- वाचक मेळावे आणि स्वतंत्र साहित्य संमेलनेही गाजली.
डॉ. पानतावणे यांची ग्रंथ संपदा
- पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- दलित वैचारिक वाङमय
- अर्थ आणि अन्वयार्थ
- चैत्य
- लेणी
- स्मृतिशेष
- विद्रोहाचे पाणी पेटले आहे
- वादळाचे वंशज
- धम्मचर्चा
- मूल्यवेध
- साहित्य शोध आणि संवाद
- आंबेडकरी जाणीवांची आत्माप्रत्ययी कविता
- लोकरंग
- साहित्य निर्मिती: चर्चा आणि चिकित्सा
- साहित्य: प्रकृती आणि प्रवृत्ती
याशिवाय त्यांनी काही ग्रंथ संपादित केली आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख, दुसर्या पिढीचे मनोगत, अस्मितादर्श नियतकालीकांचा समावेश आहे. अनेक कवी , लेखकांच्या पुस्तकांना त्यांनी विवेचक प्रस्तावनाही दिल्या आहेत.
डॉ. पानतावणे यांना लाभलेले गौरव, पुरस्कार
सन २००९ साली अमेरिकेतील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र सरकार आणि अनेक साहित्यिक , सामाजिक संस्था, संघटनातर्फे त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीचा समावेश आहे. मत्सोदरी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा ‘ मत्सोदरी शिक्षण पुरस्कार’, वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठाणचा ‘ महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
'पद्मश्री' स्वीकारण्यासाठी जाता आले नाही
डॉ. पानतावणे हे आजारामुळे रुग्णालयात दाखल होते तेव्हा २६ जानेवारी २०१८ रोजी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने अलंकृत केले. २० मार्च रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना व्यक्तीश: पुरस्कार स्विकारण्यास हजर राहता आले नाही.