विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा आरोपी प्राध्यापक मोकाटच; गुन्हा दाखल होऊन वीस दिवस उलटले
By राम शिनगारे | Published: May 16, 2023 08:33 PM2023-05-16T20:33:30+5:302023-05-16T20:33:50+5:30
आरोपी प्राध्यापकाचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीनही फेटाळला
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर हा मागील २० दिवसांपासून कुटुंबासह फरार आहे. त्याच्यासह पत्नीच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदवलेला आहे. आरोपींनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज सादर केला होता. तो अर्जही फेटाळला. त्यानंतरही शहर पोलिसांनी प्राध्यापक आरोपी सापडलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीस मदतीचे आश्वासन दिले. पेइंग गेस्टच्या रूपात स्वत:च्या घरातच राहू दिले. यानंतर काही महिन्यांनी तिच्यावर प्रा. अशोक बंडगर याने अत्याचार केले. सुरुवातीला काही दिवस अत्याचार केल्यानंतर विद्यार्थिनीने बंडगरच्या पत्नीला अत्याचाराची माहिती दिल्यानंतर तिनेही पतीचीच बाजू घेतली. त्यानंतर पत्नीच पीडितेला बंडगरच्या खोलीत पाठवून देत होती, तसेच तिनेही विद्यार्थिनीची छेड काढल्याचे फिर्यादीत म्हटले होते. २५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच बंडगर पत्नीसह फरार झाला. तो अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
विद्यापीठ प्रशासनाने त्याचे दुसऱ्याच दिवशी निलंबन केले, तसेच त्याची विभागीय चौकशी करण्यासाठीची प्रक्रियाही सुरू केली. मात्र, तो अद्यापही चौकशीला समोरे गेलेला नाही. पोलिसांत दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रा. बंडगर याने जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्याठिकाणी झालेल्या सुनावणीनंतर १२ मे रोजी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यानंतरही प्रा. बंडगर हा पोलिसांना शरण आलेला नाही, तसेच पोलिसांनाही त्याचा ठावठिकाणा अद्यापपर्यंत शोधता आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.