विद्यापीठात लवकरच प्राध्यापकांची भरती
By Admin | Published: June 3, 2016 11:40 PM2016-06-03T23:40:15+5:302016-06-03T23:50:56+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांची भरती लवकरच होणार असल्याची चिन्हे आहेत.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांची भरती लवकरच होणार असल्याची चिन्हे आहेत.
चार वर्षांपासून विद्यापीठाच्या विविध विभागांत प्राध्यापकांची भरती झालेलीच नाही. एप्रिल-२०१६ च्या आकडेवारीनुसार विद्यापीठात सध्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकपदाच्या शंभरहून अधिक जागा रिक्त आहेत. विद्यापीठातील नोकरभरती आणि प्राध्यापक भरतीकडे विद्यापीठाचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. सुमारे दहा विभाग हे एकशिक्षकी किंवा दोन शिक्षकी आहेत. पुढील वर्षी विद्यापीठातील अनेक प्राध्यापक निवृत्त होत आहेत. त्यामुळेही रिक्त पदांची संख्या मोठी राहणार आहे. इतर विद्यापीठांनी प्राध्यापक भरतीसंदर्भात दिलेल्या जाहिराती आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा दबाव यामुळे विद्यापीठाला आता प्राध्यापकपदाची जाहिरात काढणे क्रमप्राप्त आहे. जून महिन्यातच प्राध्यापक भरतीसंबंधी जाहिरात निघेल, असे संकेत मिळत आहेत. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही आता प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी होकार दिल्याचे कळते. ज्या विभागांत एकच किंवा दोनच शिक्षक आहेत, तेथील पदे भरण्यास प्राधान्य मिळणार आहे.