प्राध्यापकाचे हृदय धडधडले कामगार रुग्णात; अवयवदानामुळे मिळाले नवे आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 07:15 PM2022-06-06T19:15:19+5:302022-06-06T19:15:37+5:30
शहरातील ४० वर्षीय कामगाराच्या हृदयाचे केवळ १५ टक्के पपिंग सुरू होते. त्यामुळे तातडीने हृदय प्रत्यारोपणाची गरज होती.
औरंगाबाद : ब्रेन डेड झालेल्या औरंगाबादेतील ३३ वर्षीय प्राध्यापक रुग्णाचे शनिवारी अवयवदान झाले. यात त्यांचे हृदय मुंबईतील रुग्णालयात प्रत्यारोपण झाले. विशेष म्हणजे या हृदयाचे औरंगाबादेतील ४० वर्षीय कामगारावर प्रत्यारोपण झाले आहे. प्राध्यापकामुळे या कामगाराला नवे आयुष्य मिळाले असून, औरंगाबादेतील व्यक्तीचे हृदय हे औरंगाबादेतील व्यक्तीलाच मिळाले आहे.
शहरातील ४० वर्षीय कामगाराच्या हृदयाचे केवळ १५ टक्के पपिंग सुरू होते. त्यामुळे तातडीने हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. त्यासाठी ६ दिवसांपूर्वीच त्याला मुंबईला हलविण्यात आले होते. गंभीर प्रकृतीमुळे अवयवदानात हृदय मिळण्याच्या यादीत कामगाराला अग्रक्रम होता. कामगारासाठी ६ दिवस अत्यंत जोखमीचे होते. अखेर शनिवारी औरंगाबादेत ब्रेन डेड प्राध्यापकाचे अवयवदान झाले आणि कामगाराला हृदय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. औरंगाबादेतून चार्टर फ्लाईटने काही वेळात हृदय मुंबईत पोहोचले आणि त्याचे कामगारावर प्रत्यारोपण झाले. प्राध्यापकाचे हृदय मुंबईत धडधडले, तेही औरंगाबादेतील कामगार रुग्णावर. याविषयी रविवारी सकाळी माहिती समोर आली आणि अनेकांनी समाधान व्यक्त केले.
५ तास चालले प्रत्यारोपण
हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ही तब्बल ५ तास चालली. प्रत्यारोपणानंतर पहिले ५ दिवस हे अत्यंत नाजूक असतात. ५ दिवसांनंतर प्रत्यारोपण झालेल्या कामगाराची प्रकृती कशी आहे, हे स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
कामगारासाठी दाखविली बांधिलकी
या कामगारावर माझ्याकडे उपचार सुरू होते. त्याच्या हृदयाचे केवळ १५ टक्के पपिंग सुरू होते. त्यामुळे तातडीने हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. त्यामुळे अखेर त्याला हृदय मिळाले. औरंगाबादचे हृदय औरंगाबादच्या रुग्णाला मिळाले. हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी हे प्रत्यारोपण केले. हा कामगार कार्यरत असलेल्या कंपनीने बांधिलकी दाखवित उपचार आणि प्रत्यारोपणासाठी संपूर्ण जबाबदारी उचलली.
- डाॅ. अजित भागवत, हृदयरोगतज्ज्ञ