गावात गुटखा-दारूबंदी, अन्यथा ५० हजारांचा दंड; पहिल्याच महिला ग्रामसभेत मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 06:26 PM2023-01-17T18:26:23+5:302023-01-17T18:26:42+5:30
गेवराई पायगा ग्रामपंचायतच्या महिलाच्या पहिल्या ग्रामसभेत महत्वाचे निर्णय
फुलंब्री : तालुक्यातील गेवराई पायगा ग्रामपंचायतमध्ये मंगळवारी पहिली महिला ग्रामसभा घेण्यात आली यात नशाबंदी व गुटखा बंदीचा ठराव घेण्यात आला. या ठरावाचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपायचा दंड केला जाणार आहे असा निर्णय घेण्यात आला.
गेवराई पायगा येथील ग्रामपंचायत ची निवडणूक नुकतीच पार अप्डली यात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच मंगेश साबळे याच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महिलांची ग्रामसभा घेण्यात आली. यात गाव पातळीवर महिलांना भेडसावत असलेया विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. महिला सशक्तिकरण व उद्योगीकरण व तसेच पंधरा वित्त आयोगामध्ये महिलांसाठी येणाऱ्या विशिष्ट योजना व तसेच संपूर्ण महिलांच्या मागणीस्तव गावात माहिती देण्यात आली.
दारूबंदी, गुटखाबंदी, सिगरेट, बिड्या व गुटखा तंबाखू व इतर नशायुक्त पदार्थ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विक्रेता हे विक्री करताना आढळून आल्यास त्यासाठी पन्नास हजार रुपये दंड ठेवण्यात आला आहे. तसेच आदर्श गाव योजनेकडे वाटचाल करायची म्हणून गावात होणाऱ्या विविध विकास कामांमध्ये जो अडथळा निर्माण करेल त्याला कुठलाही शासकीय लाभ मिळणार नाही, असाही निर्णय ग्रामसभेमध्ये घेण्यात आलायावेळी सरपंच मंगेश साबळे, ग्रामसेवक राठोड, उपसरपंच कचरू साबळे, बाबुराव वाडेकर, कविता वाघ, पोलीस पाटील पंढरीनाथ जयतमाल, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पाटील साबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.
तरुण व्यसनी होत आहेत. महिलांना याचा मोठा त्रास होतो. गावात नशायुक्त पदार्थाची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. याचा चांगला संदेश जाईल, अशी माहिती सरपंच मंगेश साबळे यांनी दिली आहे.