समृद्धी महामार्गावरील मुंबई-नागपूर व्हाया औरंगाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 04:22 PM2020-09-09T16:22:31+5:302020-09-09T17:59:24+5:30
समृद्धी महामार्गावर बोगदे व अनेक ठिकाणी वळणे, इंटरचेंजेसचे अडथळे
औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर बोगदे, अनेक ठिकाणी वळणे व इंटरचेंजेस असल्यामुळे प्रस्तावित ‘मुंबई-नाशिक-नागपूर’ व्हाया औरंगाबाद या बुलेट ट्रेनसाठी हा महामार्ग तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. त्यामुळे सध्या तरी या महामार्गालगत बुलेट ट्रेनचा प्रवास थांबला आहे.
राज्याच्या राजधानीला औरंगाबादमार्गे उपराजधानीसोबत जोडण्यासाठी ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्गाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. या सुपर एक्स्प्रेस वेवरून येणाऱ्या १ मेपासून नागपूर ते नाशिकपर्यंत वाहतूक सुरू करण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केली आहे. या महामार्गासाठी १२० मीटर रुंद जमीन संपादित केली असून प्रत्यक्षात ५० मीटर रस्त्यासाठी व १५ मीटर दुभाजकासाठी वापरण्यात आली आहे. या महामार्गावर दुभाजक किंवा उर्वरित संपादित जागेवर बुलेट ट्रेनच्या मार्गाचा प्रस्ताव इंडियन हायस्पीड कॉर्पोरेशनचा होता. यासाठी गेल्या चार वर्षांपासून जागेची चाचपणी केली जात होती.
समृद्धी महामार्गाचा प्रकल्प बघून स्पेनमधील ‘एडीआएफ’ व ‘आयएनईसीओ’ या दोन कंपन्यांनी चार वेळा प्रत्यक्ष पाहणी केली व बुलेट ट्रेनसाठी हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील का, याचा अभ्यास केला. मात्र, अलीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्याजवळ येऊन पोहोचले असून या महामार्गावर ठिकठिकाणी वळणे, इंटरचेंजेस व बोगदे असल्यामुळे ३०० ते ३५० प्रतितास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी हा मार्ग व्यवहार्य नसल्यामुळे हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून अलीकडच्या काळात यासंबंधी कसल्याही हालचाली नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील चार-पाच वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम जोरात सुरू होते. त्यासोबतच बुलेट ट्रेनसाठीही भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेतली असती, तर हायस्पीड कॉर्पोरेशनला बुलेट ट्रेनचा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावता आला असता.
बुलेट ट्रेनसाठी समृद्धी महामार्ग फिजिबल नाही :
राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग जात आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी असलेले इंटरचेंजेस, वळणे व २६० मीटरचा बोगदा आहे. सुपरफास्ट धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी हा महामार्ग फिजिबल नाही. विशेष म्हणजे अलीकडे ‘एमएसआरडीसी’ला याबाबतच्या कोणत्याही सूचना शासनाकडून प्राप्त नाहीत किंवा चर्चाही नाही.