पुरे झालीत आश्वासने...छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योग आणा, रोजगार द्या!
By बापू सोळुंके | Published: April 19, 2024 04:06 PM2024-04-19T16:06:20+5:302024-04-19T16:06:59+5:30
पब्लिक मॅनिफेस्टो: मागील सहा वर्षांत डीएमआयसीमध्ये एकही मोठा प्रकल्प आणण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले नाही.
छत्रपती संभाजीनगर : आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेल्या औद्योगिक शहराचा दहा वर्षा’त विकास खुंटला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोअरमध्ये अँकर प्रोजेक्ट खेचून आणण्यात स्थानिक नेतृत्व कमी पडत आहे. परिणामी, दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या येथील हजारो तरुणांना रोजगाराच्या शोधात दुसऱ्या शहरात आणि परराज्यात जावे लागत आहे. यामुळे आता पुरे झाली आश्वासने, डीएमआयसीमध्ये उद्योग आणा, रोजगार द्या, अशी मागणी मराठवाड्यातील लघु, मध्यम उद्योजक आणि मराठवाड्यातील जनता करीत आहे.
अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे आपल्या शहराचे नाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आले. ८० च्या दशकात येथे झपाट्याने औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ रेल्वे स्टेशन परिसरात एमआयडीसी होती. नंतर चिकलठाणा आणि वाळूज, पैठण, अशा एकापाठोपाठ औद्योगिक वसाहतींचा विकास होत गेला. या वसाहतींतील भूखंड कमी पडत असल्याचे लक्षात घेऊन शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली. ही वसाहतही उद्योगांनी भरली. यामुळे शेंद्रा या नवीन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासनासमोर होता. याच काळात दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोअर (डीएमआयसी)चे येथे आगमन झाले.
ऑरिक सिटीअंतर्गत असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसी विकसित करण्यात आली. दोन्ही इंडस्ट्रिअल झोनमध्ये एकूण दहा हजार एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय औद्योगिक पायाभूत सुविधा तेथे देण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावरील जालना येथेही मोठी औद्याेगिक वसाहत आहे. स्टील इंडस्ट्री, सीड इंडस्ट्रीजचे पायोनियर शहर म्हणून जालन्याची ओळख आहे. धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड येथेही बऱ्यापैकी औद्योगिक वसाहती विकसित आहेत; परंतु तेथे मोठे प्रकल्प आणण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विशेष प्रयत्न झाले नाहीत.
मागील सहा वर्षांत डीएमआयसीमध्ये एकही मोठा प्रकल्प आणण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले नाही. उद्योग येण्यासाठी आवश्यक ती इको सिस्टम येथे आधीच विकसित झालेली आहे. यामुळे येथे येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. येथील मोठ्या आणि लघु उद्योजकांच्या संघटनाही उत्तमरीत्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडूनही येथे उद्योग यावेत, यासाठी सतत प्रयत्न केले जातात; परंतु शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद येऊ घातलेल्या कंपन्यांना दिला जात नसल्याने मराठवाड्यातील औद्योगिक विकास रखडण्याचे मुख्य कारण या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
मराठवाड्यातील नेते कमी पडतात
नागपूर शहरात आयआयएमसारखी संस्था आली. नागपूरचा औद्योगिक विकास झपाट्याने झाला. पुण्याचा विकास झाला. तसा मराठवाड्याचा विकास होण्यासाठी एकाही राजकीय नेतृत्वाने विशेष प्रयत्न केले नाहीत. उद्योगाला पोषक असे वातावरण आहे, दरवर्षी हजारो पदवीधर विद्यार्थी बाहेर पडतात. येथे मोठी गुंतवणूक असलेले प्रकल्प यावेत यासाठी सीएमआयएसारखी संस्था पुढाकार घेते; पण राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याने आपल्या पदरी निराशा पडते.
-दुष्यंत पाटील, अध्यक्ष, सीएमआयए
मराठवाड्यातील उद्योगांची संख्या
औद्योगिक वसाहतीचे नाव--- मोठे उद्योग ---मध्यम आणि लघु उद्योग
वाळूज----- १६२-----२,८६६
चिकलठाणा--५ १६३------१,१४१
शेंद्रा----- ८९----- १,०५२
पैठण---- ४६------२९७ रेल्वे स्टेशन--- ००---९६
प्रत्यक्ष रोजगार-- ६ लाख
अप्रत्यक्ष रोजगार- ५ लाख
इंडस्ट्रीजचा विकास हा राजकीय अजेंडा असावा
येथे डीएमआयसी असताना, हवा तसा उद्योगांचा फ्लो नाही. डीएमआयसीचे प्रोफेशनल पद्धतीने मार्केटिंग करण्यात कमी पडतो. संपूर्ण डीएमआयसी भरण्यासाठी पुढील २५ वर्षे लागू शकतात, मात्र मागील दहा वर्षांत येथे अँकर प्रकल्प यावा अथवा फार्मा क्लस्टर, इलेक्ट्रॉनिक्स हब किंवा आयटी हब, केमिकल इंडस्ट्रीज यावीत यासाठी स्थानिक नेतृत्व कमी पडले. येथे गुंतवणूक खेचून आणण्यासाठी राजकीय नेतृत्वाने सातत्य ठेवणे गरजेचे आहे. कधी त्यांनी जोर द्यावा, तर कधी दबाव टाकावा लागतो. येथे इंडस्ट्रीजचा विकास हा राजकीय नेतृत्वाचा अजेंडा नसल्याने दहा वर्षांत मराठवाड्याचा विकास रखडल्याचे दिसते.
- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक, तथा माजी सदस्य मराठवाडा वैधानिक विकास मंडळ.
वाळूजमधील प्रमुख मोठ्या कंपन्या
- बजाज ऑटो लि.
- गरवारे पॉलिस्टर प्रा. लि.
- स्टर्लाइट इंडस्ट्रीज
- वोखार्ड इंडिया प्रा. लि.
शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमधील प्रमुख कंपन्या
- स्कोडा ऑटो इंडिया
- हर्मन फोटोकेम प्रा. लि.
मराठवाड्यातील एमआयडीसीची नावे
छत्रपती संभाजीनगर - वाळूज, शेंद्रा, पैठण, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, शेंद्रा , शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसी, पाटोदा, वैजापूर
जालना - जालना शहर एमआयडीसी टप्पा १ आणि टप्पा २, भोकरदन, अंबड, जाफ्राबाद, परतूर, बीड, लातूर, धाराशिव, अहमदपूर, उमरगा, नांदेड, वसमत, देगलूर, गंगाखेड, हिंगोली, जिंतूर आणि कळमनुरी मिनी एमआयडीसी आहेत.