ग्रीन टुरिझमला चालना; औरंगाबाद-पुणे मार्गावर जुलैपासून इलेक्ट्रिक बस धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:45 PM2022-05-24T12:45:47+5:302022-05-24T12:46:28+5:30
‘एसटी’ची तयारी : विभागाला मिळणार २० इलेक्ट्रिक बस, इंधन खर्चात होणार बचत
औरंगाबाद :एसटी महामंडळाने औरंगाबाद-पुणे या मार्गावर साधारण जुलै महिन्यापासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. औरंगाबाद विभागाला जवळपास २० इलेक्ट्रिक बस दिल्या जाणार आहेत. त्यामुळे औरंगाबादहून पुण्याचा प्रवास इलेक्ट्रिक बसने करता येणार आहे. इलेक्ट्रिक बससेवेसाठी चार्जिंग स्टेशनच्या उभारणीलाही गती दिली जात आहे.
एसटी महामंडळाच्या १ जूनला होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील तमाम प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याची तयारी करण्यात आली आहे. राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. याच मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस चालवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. डिझेलची सतत होणारी दरवाढ आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चामुळे एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या बसेससाठी कंत्राटही देण्यात आले असून, लवकरच या बसेस महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयाकडे येणार आहेत. तेथून राज्यातील प्रमुख शहराला या बसेसचे वाटप होणार आहे.
सध्या औरंगाबाद -पुणे मार्गावर जवळपास १८ शिवशाही धावत आहेत. आता या मार्गावर लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसणार आहे. पुणे विभागाच्या देखील किमान २० इलेक्ट्रिक बसेसही धावणार असल्याने या मार्गावर केवळ इलेक्ट्रिक बसेसची सेवा असणार आहे. जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात किमान २० इलेक्ट्रिक बसेस औरंगाबादेत दाखल होतील, असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
याठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन
एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील जागेत चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. या स्टेशनमध्ये १५ बसेस चार्जिग होतील, अशी व्यवस्था राहणार आहे. एक बसच्या चार्जिंगसाठी किमान ६ तासाचा अवधी लागणार आहे.