नियमानुसार पदोन्नती, मुदतवाढ दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:05 AM2021-09-26T04:05:21+5:302021-09-26T04:05:21+5:30
औरंगाबाद : महापालिकेचे कामकाज शासन नियमानुसारच सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आलेली पदोन्नती नियमबाह्य नाही. मुदतवाढही शासनाने ...
औरंगाबाद : महापालिकेचे कामकाज शासन नियमानुसारच सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना देण्यात आलेली पदोन्नती नियमबाह्य नाही. मुदतवाढही शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच असल्याचे मत महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.
मुख्य लेखाधिकारी म्हणून संजय पवार यांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देताना त्यांच्याकडून प्रशासनाने शपथपत्र घेतले आहे. भविष्यात मुख्य लेखाधिकारी म्हणून शासनाकडून अधिकारी नियुक्त केल्यास ते परत लेखाधिकारीपदावर येतील. त्यांच्या पदोन्नतीसंदर्भात शासनाने अहवाल मागविला आहे. कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाहीत. त्याचप्रमाणे उपायुक्त अपर्णा थेटे यांना पदोन्नती दिली. त्याला शासनाने मंजूरी दिली. दुसरे उपायुक्त रवींद्र निकम यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून पदोन्नती दिली होती. त्यांनी उपायुक्त म्हणून १० वर्षे सेवा केलेली नाही. पुढील वर्षी त्यांची दहा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर पदोन्नती देण्यात येईल. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांना मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढही शासनाने मंजूर केली आहे. महापालिकेत अलीकडे १८७ कर्मचाऱ्यांना शासन निर्देशानुसार सेवेत कायम केले. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली. यासंदर्भातही शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. शासनाने होकार दिला तरच पुढील निर्णय होईल. महापालिकेत कोणतेही काम नियमाच्या बाहेर होत नाही, असेही पाण्डेय यांनी नमूद केले.