मनपा देणार पर्यटनाला चालना
By Admin | Published: September 20, 2014 12:15 AM2014-09-20T00:15:42+5:302014-09-20T00:28:06+5:30
औरंगाबाद : महापालिका शहराच्या ऐतिहासिकतेला उजाळा मिळावा यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याच्या विचारात आहे.
औरंगाबाद : महापालिका शहराच्या ऐतिहासिकतेला उजाळा मिळावा यासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याच्या विचारात आहे. मुंबई, पुणे, ठाण्याच्या ट्रॅव्हल्स एजन्सींशी संपर्क साधून हा उपक्रम राबविण्यात येईल. ट्रॅव्हल्स पॅकेजमध्ये औरंगाबादमधील ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यासाठी खाजगी संस्थांना उद्युक्त केले जाईल. पर्यटकांचा औरंगाबादमध्ये मुक्काम वाढला तर त्याचा फायदा येथील रोजगाराच्या संधी वाढण्यात होईल. तसेच पालिकेच्या उत्पन्नातही काही प्रमाणात भर पडेल. नागरिकांच्या हाती पैसा येण्यास सुरुवात झाली तर त्यांची जीवनशैली सुधारण्यास मदत होईल. त्यांना पैसा मिळाला तर ते विविध करांचा भरणा करू शकतील, असा तर्क पालिका प्रशासन लावत आहे.
रोजगार वाढण्यासाठी या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात मदत होईल, असा पालिकेला विश्वास आहे. मनपातील काही बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात मुंबई, पुणे, ठाण्याच्या धर्तीवर खाजगीकरणातून पर्यटन विकास करावा, असा विचार आहे. मात्र, पालिका सत्ताधारी याला किती प्रतिसाद देतात यावर उपक्रम सुरू होणार, हे सर्व काही अवलंबून आहे.
मनपाने पर्यटनस्थळांची केली पाहणी
महापालिकेने शहरातील पर्यटनस्थळ परिसरात १२ तासांमध्ये दोन वेळा साफसफाई करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी बीबीका मकबरा, पाणचक्की, सलीम अली सरोवर, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय, मोलाना आझाद संशोधन केंद्र या पर्यटनस्थळांची पाहणी केली. शहरातील पर्यटनस्थळांना अनेक पर्यटक भेटी देतात. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांचा परिसर स्वच्छ दिसावा, यासाठी टपरीचालक, दुकानदारांना स्वत: कचराकुंडी ठेवावी लागेल. त्याप्रकरणी आज पर्यटनस्थळ परिसरातील व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मनपाचे पथक त्या कचराकुंडीतून कचरा गोळा करून घेऊन जाईल.
दिवसातून दोन वेळा कचरा संकलन होईल. दुकान उघडणे आणि बंद होण्याच्या वेळेत मनपाचे पथक कचरा संकलनासाठी जाईल. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होणार आहे.