प्रचाराची रणधुमाळी थांबली; फोडाफोडी, पाठिंब्याच्या राजकारणाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:24 PM2019-04-22T14:24:48+5:302019-04-22T14:31:32+5:30
सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद : पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली असून, उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणाºया भोंग्यांचा आवाज बंद झाला आहे. आता गुफ्तगू आणि फोडाफोडीच्या राजकारणासह विविध संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारी दिवसभर धावपळ सुरू असणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचार रविवारी सायंकाळी ५ वा. संपला. शेवटच्या दिवशी पूर्ण शक्तिप्रदर्शनाने सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात २३ उमेदवार आहेत. यामध्ये शिवसेना- भाजप महायुती, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी, एमआयएम, अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. चौरंगी लढतीमुळे मैदान कोण मारणार, हे अस्पष्ट आहे. कडक उन्हाळ्यात निवडणुका असल्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार करताना घाम निघाला. २८ मार्चपासून उमेदवार अर्ज भरण्याची मुदत होती.
८ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर लोकसभा मैदानाचे चित्र स्पष्ट झाले. २३ उमेदवार मैदानात राहिले. पदयात्रा, रिक्षा, सभा, कॉर्नर बैठका घेऊन मागील पंधरा दिवस पूर्ण मतदारसंघात रणधुमाळी सुरू राहिली. जिल्हा प्रशासनाने ‘एक खिडकी’तून वाहन रॅली, प्रचार सभांसह प्रचार वाहनांना परवानगी दिली. अंदाजे ३०० हून अधिक रिक्षा, चारचाकी प्रचारात होत्या. रविवारी सायंकाळी ५ वा. प्रचार तोफा थंडावल्यानंतर सर्व पक्ष-अपक्ष उमेदवारांनी प्रचार वाहनांचा आढावा घेत त्यावरील भोंगे, स्पीकर्स, बॅनर्स, झेंडे काढून घेतले की नाहीत, याचा आढावा घेतला.
स्टार प्रचारकांच्या सभांचा बोलबाला
या वेळच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचाराकांच्या सभा झाल्या. शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आ. टी. राजासिंग, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा. नितीन बानगुडे यांच्या सभा झाल्या. कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण आदींच्या सभा झाल्या. जालना लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गडकरी आदींच्या सभा झाल्या. एमआयएम उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. असदोद्दीन ओवेसी, भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. काही अपक्ष उमेदवारांनी स्वत:च सभा घेऊन प्रमुख पक्षातील उमेदवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.