फटाका मार्केट सुरू होण्यापूर्वीच वादाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:28 PM2018-10-28T23:28:41+5:302018-10-28T23:29:37+5:30
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, ...
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या हद्दीत अयोध्यानगरी येथील गट नं. १९०, १९१ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाका मार्केट भरविण्यात येणार असून, दुकाने थाटण्यावरून दोन संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशन आणि जय महाराष्ट्र फटाका मार्केट यांच्यात अधिकृत आणि अनधिकृत या मुद्यावरून वाद पेटला आहे. नियमानुसार एकाच ठिकाणी दोन मार्केट भरविणे शक्य नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी फटाका मार्केटवरून तक्रारी सुरू केल्या आहेत.
२९ आॅक्टोबर २०१६ रोजी जि.प.मैदानावरील फटाका मार्केट जळून खाक झाले होते. १४० दुकानांची परवानगी असताना तेथे १८० दुकाने थाटण्यात आली होती. तसाच प्रकार अयोध्यानगरी येथील मार्केटमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्सव व्यापारी असोसिएशनने ५० दुकानांची परवानगी पुणे येथील छावणी विभागाकडून घेतली आहे. पुणे येथील छावणी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ती जागा असोसिएशनला देण्यात आली आहे, तर जय महाराष्ट्र फटाका मार्केटची २५ दुकाने थाटण्यात येणार आहेत. त्यांनाही पूर्ण परवानगी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
दोन्ही मार्केट अध्यक्षांचा दावा असा
उत्सव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद खामगावकर यांनी सांगितले, गट नं.१९०, १९१ मधील १ एकर जागेत फटाका मार्केट उभारण्यासाठी छावणी परिषदेने आम्हाला परवानगी दिली आहे. ५० दुकानांना पोलीस, मनपा, पीडब्ल्यूडी, छावणी परवानगी मिळाली आहे. फायर ब्रिगेडची परवानगी बाकी आहे. आमची दुकाने नियमात असून अधिकृत आहेत. एकाच गटात दोन मार्केट असू शकत नाहीत.
जय महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी सांगितले, २५ दुकाने उभारण्यासाठी अधिकृतरीत्या परवानगी मिळाली आहे. नियमात बसून मार्केट उभारले जाईल. छावणीने गट नं. १९१ मध्ये आम्हाला जागा दिली आहे. उत्सव असोसिएशनला गट नं. १९० मध्ये त्यांना जागा दिलेली असताना गट नं. १९२ व ९३ मध्ये त्यांनी दुकाने लावल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.
परवाना नियम असा...
३ मीटर अंतर दोन दुकानांमध्ये असणे आवश्यक आहे. रस्त्यापासून ९०० फुटावर दुकाने असावेत. १० बाय १० ची जागा एका दुकानाला असावी. अग्निशामक आणि पोलिसांचा परवाना मिळाल्यावरच फटाके विक्री करण्याचे दुकान थाटता येते. ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची तपासणी करूनच परवाने दिले जातात. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकामाचे दुकान नसेल तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे, तसेच किराणा, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि स्फोटक रसायने असलेल्या दुकानांच्या शेजारी स्टॉल उभारू नये, अशा सूचना अग्निशामक विभागातर्फे देण्यात येतात. हे सगळे नियम पाळले आहेत की नाहीत. याची पाहणी करण्याची मागणी होत आहे.
त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण; मदत कागदावरच
सरकार: तासाभराच्या आगीत झाले होते १० कोटींहून अधिक नुकसान
औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजारात २९ आॅक्टोबर रोजी झालेल्या अग्नितांडवात फटक्यांची १४० दुकाने आगीत खाक झाली होती. तसेच ११२ वाहनेही जळाली. यात एकूण १० कोटी ५८ लाख ३७ हजार ६७० रुपयांचे नुकसान झाल्याचा सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे पाठविला. मंडप व वाहने मिळून १५ कोटींपर्यंतचे नुकसान झाले होेते. त्या प्रकरणात अद्याप काहीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. अग्निशामक विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या साडेदहा एकर मैदानावर १८० फटाका विके्रत्यांना परवानगी दिली होती.
औरंगाबाद फटाका असोसिएशनच्या भरवशावरच फटाक्यांचा बाजार भरला होता. त्या १०.५ एकरमध्ये दुकाने किती, पार्किंगची व्यवस्था कशी असेल. पाण्याचे टँकर,अग्निशमन बंबची व्यवस्था, दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्यासाठी किती गेट असावेत. याचा कुठलाही नकाशा त्यावेळी तयार करण्यात आला नव्हता. मनपा अग्निशमन यंत्रणा, पोलीस विभागाने दुर्लक्ष केल्याने जि.प.मैदानावरील फटाका बाजार ‘रामभरोसे’च भरला होता.