एसटी चालकांना तातडीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:04 AM2021-03-27T04:04:42+5:302021-03-27T04:04:42+5:30
औरंगाबाद : लॉकडाऊन काळात श्रमिक मजुरांसाठी एसटीने चालकांच्या जोरावर मदतीचा हात दिला. मात्र, त्यांनाच एसटी महामंडळाने प्रोत्साहन भत्ता देण्यास ...
औरंगाबाद : लॉकडाऊन काळात श्रमिक मजुरांसाठी एसटीने चालकांच्या जोरावर मदतीचा हात दिला. मात्र, त्यांनाच एसटी महामंडळाने प्रोत्साहन भत्ता देण्यास डावलल्याने चालकांवर केवळ प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. त्या चालकांना तातडीने प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने विभागीय नियंत्रकांकडे केली आहे.
लॉकडाऊन काळात या चालकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालकांच्या वतीने या निर्णयाचे स्वागतही झाले. प्रोत्साहन भत्ता मिळेल या अपेक्षेने चालकांनी कोरोनाकाळात परराज्यात जा ये करत एसटीच्या तब्बल ३९३ फेऱ्या मारल्या. ३९३ चालकांनी परराज्यातील तब्बल ८,७२९ श्रमिकांना सुखरूप आपापल्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवले. त्यांना प्रतिदिन ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय झालेला असताना या प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय केवळ कागदोपत्रीच ठेवून अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. चालकांना तातडीने प्रोत्साहन भत्ता न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार, जिल्हा अध्यक्ष उमेश दीक्षित, विभागीय अध्यक्ष एन. डी. दिनोरिया, महिला प्रतिनिधी मीरा चव्हाण यांनी दिला आहे.