मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलिसांची जय्यत तयारी; ५ डीसीपी, ६ एसीपीसह १ हजार पोलीस तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:16 PM2022-06-08T13:16:37+5:302022-06-08T13:17:04+5:30
यासोबतच सभेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत
औरंगाबाद : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ८ जून रोजी आयोजित शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. सभेसाठी ५ पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, सुमारे २०० पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार, १ हजार पोलीस आणि ४०० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच सभेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.
पोलीस आयुक्त म्हणाले, ८ जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला बाहेरगावाहून हजारो नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूककोंडी टाळण्यासाठी कर्णपुरा आणि एम.पी. लॉ कॉलेजच्या मैदानावर वाहनतळ करण्यात आले आहे. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित राहू शकतो. सभा शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. सभेसाठी शहर पोलीस दलातील तीन पोलीस आयुक्तांच्या मदतीला बाहेरून ५ पोलीस उपायुक्त येणार आहेत. यासोबतच ६ सहायक पोलीस आयुक्त, सुमारे २०० पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार, १ हजार पोलीस अंमलदार, महिला पोलीस आणि ४०० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. सभास्थळासाठी स्वतंत्र १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, या कॅमेऱ्यांचा कंट्रोल कक्ष मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरच असेल. तसेच स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत शहरातील सर्वच रस्ते, चौक आणि गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
तीन ठिकाणी स्क्रीन
सभा स्थळी येऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी शहरातील खडकेश्वर, मल्टीपर्पज हायस्कूल आणि कर्णपुरा येथे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. येथे नागरिक स्क्रीनवर सभा पाहू शकतील.