मालमत्ता विभागाचा मनपाच्या तिजोरीवरच डल्ला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 04:33 PM2018-10-08T16:33:17+5:302018-10-08T16:36:21+5:30
महापालिकेच्या तिजोरीत वैध मार्गाने निधी येऊ नये यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद : महापालिकेचा मालमत्ता विभाग तिजोरीवर अक्षरश: दरोडे टाकत आहे. महापालिकेच्या तिजोरीत वैध मार्गाने निधी येऊ नये यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून येत आहे. चिकलठाणा येथील आठवडी बाजाराची निविदा मागील वर्षी संपली. जानेवारी २०१८ मध्ये नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता मंजुरीसाठी ही निविदा स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली आहे. मागील १० महिन्यांपासून आठवडी बाजाराचे दरमहा एक लाख रुपये कोण जमा करीत होता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील दहा महिन्यांचे दहा लाख रुपये कुठे गेले? यावरही प्रशासनाकडे उत्तर नाही.
चिकलठाणा येथे महापालिकेतर्फे आठवडी बाजार भरविण्यात येतो. मागील वर्षीच आठवडा बाजाराची निविदा संपली. महापालिकेने उशिराने नवीन निविदा काढली. जानेवारी २०१८ मध्ये लेखाधिकारी, मालमत्ता अधिकाऱ्यांनी मिळून निविदा उघडली. एकूण चार निविदा आल्या होत्या. त्यातील गिरधारे राजू राहुल यांनी २४ हजार ५०० रुपये देऊन ठेका घेण्याची तयारी दर्शविली. ही निविदा मंजुरीसाठी आॅक्टोबरमध्ये स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली आहे. मागील दहा महिन्यांत अंतिम झालेली निविदा मंजुरीसाठी का ठेवली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठांचे दुर्लक्ष
महापालिकेचा मालमत्ता विभाग म्हणजे असंख्य घोटाळ्यांचे माहेरघर होय. वर्षानुवर्षे याठिकाणी ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी तिजोरीत कमी आणि स्वत:कडे जास्त महसूल कसा येईल, यावरच अधिक भर देत आहेत. शहरातील आठवडी बाजार, पार्किंग, दुकाने यामध्ये प्रचंड अनागोंदी सुरू आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारीही याकडे अजिबात लक्ष देत नाहीत.