मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीत ७० कोटींची तूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:52+5:302021-07-10T04:04:52+5:30
औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक झळ बसली आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल ७० कोटींनी वसुली कमी झाली ...
औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेच्या तिजोरीला आर्थिक झळ बसली आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल ७० कोटींनी वसुली कमी झाली आहे. मालमत्ता कराच्या माध्यमातून ६० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना फक्त २७ कोटी वसूल झाले. पाणीपट्टीपोटी ३६ कोटी अपेक्षित असताना केवळ ५ कोटी ५० लाख रुपये मिळाले. त्यामुळे अत्यावश्यक कामे, दैनंदिन खर्चावर मर्यादा येत आहेत. कोरोना संसर्गापूर्वी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था होती. त्यामुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांची रक्कम तब्बल २५० कोटींवर गेली होती.
महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मागील दीड वर्षांपासून आर्थिक नियोजन सुरू आहे. नागरिक मालमत्ता कर, पाणीपट्टी भरायला तयार नाहीत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत मालमत्ता करापोटी ६० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात २७ कोटी वसूल झाले. पाणीपट्टीपोटी ३६ कोटी रुपयांची वसुली अपेक्षित होती; पण ६ कोटी ५० लाख रुपये जमा झाले. सरासरी ४० टक्केच वसुली झाली आहे. महापालिकेने शहरातील अनेक मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत. त्यापोटी ३ महिन्यांत ८ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; पण केवळ ५० लाख रुपये जमा झाले. मनपाचा दैनंदिन खर्च जशास तसा आहे. अत्यावश्यक कामांसाठी उत्पन्नातील ६५ टक्के रक्कम खर्च होते; पण केवळ ४० टक्केच वसुली झाल्यामुळे आर्थिक गणित बिघडत आहे.
---------
तीन महिन्यांतील वसुली
उद्दिष्ट-वसुली (आकडे कोटींत)
मालमत्ता कर -६०-२७
पाणीपट्टी ३६- ०६.५०
मालमत्ता विभाग ०८ - ००.५०
-----------
दरमहा अत्यावश्यक खर्च (आकडे कोटींत)
कर्मचाऱ्यांचे वेतन-२२
पाणीपुरवठा वीज बिल-०४
पथदिवे-००.७५ लाख
कर्जाचे हप्ते-०१
एसटीपी प्लांट वीज बिल-००.७० लाख
कर्मचारी पेन्शन-०३
शिक्षण विभाग-०२
बचत गट कर्मचारी वेतन-०१