मालमत्ता-पाणीपट्टी वसुलीने गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:10 AM2017-10-22T01:10:36+5:302017-10-22T01:10:36+5:30
मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीने तळ गाठला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीने तळ गाठला आहे. १ एप्रिल ते १ आॅक्टोबरपर्यंत फक्त ४३ कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसूल झाले आहेत. पाणीपट्टी वसुलीकडे तर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वत:हून पाणीपट्टी भरली तर मनपा ती जमा करून घेत आहे. स्वत: पाणीपट्टीच्या वसुलीसाठी अजिबात लक्ष देण्यात येत नाही. मागील काही महिन्यांपासून जीएसटीच्या अनुदानात वाढ झाल्याने महापालिका या निधीवरच उधळपट्टी करीत आहे.
मालमत्ता कराचे उद्दिष्ट २७० कोटी ठरविण्यात आले आहे. या तुलनेत दहा टक्केही वसुली मनपाने केलेली नाही. वसुलीसाठी कर्मचारी नाहीत, अशी ओरड वॉर्ड अधिका-यांकडून करण्यात येत होती. आता आऊटसोर्सिंगच्या माध्यमाने तब्बल ९० कर्मचारी नऊ वॉर्ड कार्यालयांना देण्यात आले आहेत. मालमत्ता कराची डिमांड वाटणे आणि वसुली करणे हे काम या कर्मचा-यांकडून अपेक्षित आहे. मनपा या कर्मचाºयांवर दरमहा तब्बल १४ लाख रुपये खर्च करीत आहे. हा प्रयोग अयशस्वी ठरल्यास सर्व ९० कर्मचा-यांना घरी पाठविण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरणार नाही.
कर लावण्यासाठीही दुर्लक्ष
महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला मालमत्तांना कर लावण्याासाठी स्वतंत्र कर्मचारी देण्यात आले आहेत. हे कर्मचारी सोयीच्या ठिकाणीच कर लावण्यात मग्न आहेत.
अनेक ठिकाणी तर निव्वळ सेटलमेंटवर भर देत आहेत. पैठणगेट येथील एका व्यावसायिक इमारतीला अशाच पद्धतीने अभय देण्यात आले आहे. पैठणगेट भागात मोबाइल हब तयार झाला आहे. या भागातील दुकानांना कोणताही व्यावसायिक कर लावलेला नाही.