१० आरोग्य केंद्रांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:51 PM2017-12-28T23:51:45+5:302017-12-28T23:51:48+5:30
जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व आरोग्य सेवेची गरज लक्षात घेता नवीन १० प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने आरोग्य संचालनालयाकडे सादर केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व आरोग्य सेवेची गरज लक्षात घेता नवीन १० प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने आरोग्य संचालनालयाकडे सादर केले आहेत.
तथापि, यापूर्वी आरोग्य संचालनालयाने नवीन ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली असून, यापैकी शिवना व वाळूज येथे इमारतीचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी शिवना येथे आरोग्य केंद्राचे कामकाज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुरू झाले आहे. मंजूर अन्य ४ आरोग्य केंद्रांच्या इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळालेला नाही. निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ इमारत बांधकाम केले जाईल व त्यानंतर आरोग्य संचालनालयाकडून मनुष्यबळाची पूर्तता होईल.
सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी चालू आर्थिक वर्षात सर्वसाधारण सभांमध्ये जवळपास १० नवीन आरोग्य केंद्रांना मान्यता दिली. यामध्ये कन्नड तालुक्यातील वासडी, सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, पैठण तालुक्यातील नायगाव किंवा वडवळी, पैठणखेडा, गंगापूर तालुक्यातील जामगाव आणि मांजरी, वैजापूर तालुक्यात धोंदलगाव, खुलताबाद तालुक्यात तीसगाव, लासूर स्टेशन येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर तसेच आडगाव कोलते येथे उपकेंद्रांचा समावेश आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा आरोग्य कार्यालयाने सदरील केंद्रांसाठी इमारत उभारणीसाठी निधी व मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे सादर केला आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर म्हणाले की, मागील वर्षामध्ये मंजूर आरोग्य केंद्रांपैकी जिल्हा नियोजन समितीने वाळूज आणि शिवना या दोन आरोग्य केंद्रांसाठी निधी दिला आहे. या दोन्ही ठिकाणी इमारतींचे बांधकाम ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मागील वर्षात आरोग्य संचालनालयाची मंजुरी मिळालेल्या आणखी ४ आरोग्य केंद्रांसाठी ‘डीपीसी’कडून निधी मिळालेला नाही. त्यासाठी विभागामार्फत पाठपुरावा सुरू आहे. कार्यरत काही आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे तेथे रुग्णसेवेचा भार वाढला आहे. त्यामुळे लागूनच नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळालेली आहे. साधारणपणे ३० हजार लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित केले जाते.