१८० गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव
By Admin | Published: May 16, 2017 11:19 PM2017-05-16T23:19:20+5:302017-05-16T23:20:40+5:30
बीड : वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या १८० जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारंवार गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या १८० जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची दस्तूरखुद्द अधीक्षक जी. श्रीधर हे स्वत: हजेरी घेणार आहेत.
खून, मारामाऱ्या, घरफोड्यांसह अवैध व्यवसायांमध्ये तेच ते आरोपी सहभागी असल्याचे अधीक्षक श्रीधर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी सर्व ठाणेप्रमुखांना आपल्या हद्दीतील गुन्हे प्रवृत्तीच्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात एप्रिलअखेरपर्यंत १८० गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव ठाणेप्रमुखांनी संबंधित उपअधीक्षकांकडे पाठविले होते. उपअधीक्षकांनी सुनावणी घेऊन तडीपारीच्या कारवाईची शिफारस अधीक्षकांकडे केली. अधीक्षकांच्या स्वाक्षरीसह हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेले आहेत. या प्रस्तावांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी चर्चा करुन उपविभागीय अधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, तडीपारीच्या १८० प्रस्तावांसोबत काही जणांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी गेवराई तालुक्यातील दोन वाळू माफियांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. उपअधीक्षकांकडे आणखी १५ प्रकरणे प्रलंबित असून त्यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे तडीपारीच्या कारवाईच्या प्रस्तावांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अधीक्षक जी. श्रीधर यांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार करणाऱ्या आरोपींचा स्वत: आढावा घेणार आहेत. ‘हिस्ट्रीसीटर’ गुन्हेगारांची यादी पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. यापैकी काही गुन्हेगार जामिनावर सुटलेले आहेत. त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.