जलपरीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा प्रस्ताव
By Admin | Published: July 28, 2016 12:41 AM2016-07-28T00:41:02+5:302016-07-28T00:59:34+5:30
लातूर : लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही.
लातूर : लातूर शहराला मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत जलपरीची सेवा कायम ठेवावी, असा प्रस्ताव महानगर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला आहे.
लातूर शहरात अभुतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने १२ एप्रिलपासून लातूर शहराला रेल्वेव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या अर्धा पावसाळा संपला तरी मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. शिवाय, जिल्ह्यातील प्रकल्पही कोरडेठाक आहेत. सध्याही पाणीटंचाई असल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मिरजहून पाणीपुरवठा करणाऱ्या जलपरीची सेवा बंद करण्यात येऊ नये. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही आणि प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत जलपरीची सेवा सुरू ठेवावी, असे लातूर महानगर पालिकेने सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. परंतू या पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर अद्याप आले नाही. त्यामुळे प्रकल्पात पाण्याचा साठा झालेला नाही. मांजरा प्रकल्प क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, मांजरा प्रकल्प कोरडा आहे.
या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याशिवाय, लातूरकरांना नळाव्दारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे जलपरीची सेवा आवश्यक असल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.
चांगला पाऊस होईपर्यंत जलपरी़़़
४लातूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत ३३७ मि़मी़ पाऊस झाला आहे़ मात्र या पावसाचे पाणी जमिनीच्या बाहेर आले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणीसाठा झालेला नाही़ शिवाय, मांजरा प्रकल्प क्षेत्रातही मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे या प्रकल्पातही पाण्याची पातळी वाढली नाही़ गेल्या दोन दिवसांत लातूर शहर व जिल्ह्यात तसेच मांजरा प्रकल्प क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे़ परिणामी, हळूहळू पाणी यायला सुरूवात झाली आहे़ परंतु, नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी स्थिती नाही़ त्यामुळे जलपरीच्या मदतीची गरज असल्याचे रेल्वे प्रशासनाला कळविण्यात आले आहे़
रेल्वेकडे मुदत वाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला मुदतवाढ मिळेल. जोपर्यंत पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत रेल्वेची सेवा राहणार आहे. तसे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे बोलणे झाले असून, प्रस्तावाला मुदवाढ देण्यासाठी रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्याचे लातूर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कावळे यांनी सांगितले.