जिल्ह्यात केंद्रवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे
By Admin | Published: September 23, 2014 01:24 AM2014-09-23T01:24:41+5:302014-09-23T01:39:08+5:30
औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे
औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख इतकी होती, लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने सातत्याने मतदार नोंदणी मोहीम राबविली. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाख ४४ हजार इतकी झाली आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्याही वाढवावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या लक्षात घेऊन ११७ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २७४७ वर पोहोचणार आहे. नवीन मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ३७ केंदे्र औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आणि ३५ मतदान केंदे्र औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रस्तावित करण्यात आली आहेत.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही ११ नवीन मतदान केंदे्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच गंगापूर मतदारसंघात १६, वैजापूर मतदारसंघात ३, पैठण मतदारसंघात ८, सिल्लोड मतदारसंघात ४, कन्नड मतदारसंघात २ आणि फुलंब्री मतदारसंघात १ नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने काही मतदान केंद्रांच्या जागांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. जिल्ह्यातील १८४ मतदान केंद्रांच्या बाबतीत असे बदल सुचविले आहेत. मतदारांना अधिक सोयिस्कर ठरण्याच्या दृष्टीने हे बदल सुचविले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक ६७ केंद्रांचे बदल औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुचविण्यात आले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही ५१ मतदान केंद्रांमध्ये बदल सुचविण्यात आले आहेत.