"औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे आलाच नाही"; भागवत कराडांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 11:41 AM2022-06-05T11:41:39+5:302022-06-05T11:41:48+5:30
"उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी काहीलोक चुकीची माहिती देत आहेत."
औरंगाबाद: मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा मुद्दा जोर धरत आहे. दरम्यान, या शहरांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नसून, काहीजण हवेत बाता मारत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. 'लोकमत'शी बोलताना कराड यांनी ही माहिती दिली.
'केंद्राकडे प्रस्ताव नाही'
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या 8 जून रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे करत आहेत. याबाबत डॉ. कराड यांना विचारले असता ते म्हणाले की, "कोणत्याही शहराच्या नामकरणाचा मुद्दा आधी राज्याच्या विधानसभेत मंजूर करुन, नंतर राज्य केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवत असतो. शहराचे नाव बदलायचे असल्यास, त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, पोस्ट खाते इत्यादी खात्यांची परवानगी लागते."
'राज्य सरकार राजकारण करत आहे'
ते पुढे म्हणाले की, "माझ्या माहितीनुसार, राज्य सरकारने अद्याक अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी काहीलोक चुकीची माहिती देत आहेत. चंद्रकांत खैरे जो प्रचार करत आहेत, तो चुकीचा आहे. दोन्ही शहरांचे नावे बदलण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण राज्य सरकार नावावरुन राजकारण करत आहे," असा आरोपही कराड यांनी यावेळी केला.