शौचालय असूनही अनुदानासाठी प्रस्ताव
By Admin | Published: January 29, 2017 11:49 PM2017-01-29T23:49:26+5:302017-01-29T23:52:34+5:30
लातूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान देण्याची योजना आहे़
लातूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान देण्याची योजना आहे़ मनपाच्या स्वच्छता विभागात वैयक्तिक शौचालयाचे हजारो प्रस्ताव दाखल झाले आहेत़ आतापर्यंत मनपाने १० हजार प्रस्तावांची छाननी केली असून, स्पॉट पाहणी केली असता यापैकी अडीच हजार लोकांकडे शौचालय आढळले आहे़ शौचालय असताना अनुदान उचलण्याचा प्रयत्न होत असल्याचे या स्पॉट पंचनाम्यातून निदर्शनास आले़
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपाने वैयक्तिक शौचालयाला अनुदान देण्यासाठी योजना सुरू केली आहे़ या योजनेचा आतापर्यत ६ हजार ३०० लोकांनी फायदा घेतला असून, शासनाचे १२ हजार आणि मनपाचे ५ हजार, असे एकूण १७ हजार रूपये वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी या लाभार्थ्यांना वाटप केले आहेत़ ही योजना सुरूच असल्याने गेल्या १५ दिवसात मनपात हजारो प्रस्ताव अनुदान मिळावे म्हणून दाखल झाले आहेत़ या प्रस्तावांची छाननी स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी केली असून, स्पॉट पाहणीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ १० हजार प्रस्तावांची स्पॉट पाहणी केली असता २ हजार ५०० लोकांकडे शौचालय असल्याचे आढळून आले़ केवळ अनुदानासाठी प्रस्ताव येत आहेत़