औरंगाबाद ते पुणे रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:03 AM2021-07-31T04:03:26+5:302021-07-31T04:03:26+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याच्या उद्योगाला चालना मिळण्यासाठी औरंगाबाद ते पुणे या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्र ...
औरंगाबाद : मराठवाड्याच्या उद्योगाला चालना मिळण्यासाठी औरंगाबाद ते पुणे या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे. सीएमआयए, मसिआ, सीआयआय आदी उद्योग संघटनांशी चर्चा करून या मार्गासाठी सर्व डाटा संकलित केला असून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
येथील ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग, जालन्यातील स्टील उद्योग व ड्रायपोर्ट आणि डीएमआयसीला चालना मिळण्याच्या हेतूने हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव तयार करताना वार्षिक करभरणा, दळणवळण आणि कच्चा व पक्का माल निर्यातीची टननिहाय क्षमता याचा विचार करण्यात आला आहे. मराठवाड्यात उद्योगांची संख्या, लघु व मध्यम उत्पादक आदीबाबत प्रस्तावात माहिती आहे. प्रवासी वाहतुकीसह इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणून या मार्गाचा विचार होण्याची शक्यता आहे.
हा मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे शंभर टक्के निधी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे निधीच्या पर्यायांचा विचार होत आहे. निधीसाठी राज्य शासनाला काही वाटा उचलावा लागणार आहे. एमआयडीसीही यासाठी मदत करण्यासाठी पुढे येऊ शकते.
काय फायदा होईल या मार्गामुळे
हा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर मराठवाड्याचा विकासदर वाढण्यास मदत होईल. उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल. डीएमआयसीमध्ये गुंतवणूक वाढणे शक्य होईल. सध्या औरंगाबाद ते पुण्यासाठी असलेली कनेक्टिव्हीटी सुमार दर्जाची आहे. औरंगाबादेत ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, बियाणे, औषधी, ब्रेव्हरिज आदी उद्योग आहेत. शेजारी जालना जिल्ह्यात स्टील उद्योगांची संख्या मोठी आहे.
चौकट..
समृध्दीने सव्वा तासात शिर्डी
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, समृध्दी महामार्गावर कोकमठाण वरून शिर्डीकडे जाण्यासाठी इंटरचेंज करण्याचा विचार झाला आहे. समृध्दी महामार्ग कोकमठाण पर्यंत वापरला तर तासाभरात शिर्डीला जाता येईल. यावर काम सुरू आहे. माळीवाडा इंटरचेंजवरून समृध्दीवर जाता येईल. तेथून पुढे कोकमठाण आहे, तेथून सहा किलोमीटर शिर्डी आहे. एमएसआरडीसी अधीक्षक अभियंत्यांसोबत आज सकाळी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी त्याबाबत तयारी दर्शविली आहे. सध्याच्या रस्त्याने शिर्डीसाठी तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतो.
चौकट...
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी चर्चा
नवीन रेल्वेलाईनमुळे उद्योग, पर्यटनाला फायदा होईल. पुण्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल. या रेल्वे लाईनबाबत रेल्वे खात्याशी बोलणे सुरू आहे. हा प्रस्ताव मूर्त रूपात येण्यास थोडा वेळ लागेल. याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा झाली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.