५६ पैकी चारच ग्रा.पं.चे तंटामुक्तीसाठी प्रस्ताव
By Admin | Published: September 14, 2014 11:43 PM2014-09-14T23:43:02+5:302014-09-14T23:46:45+5:30
पिंपळनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथे तंटामुक्ती अभियानाला उदासिनता आल्यामुळे दिवसेंदिवस तंट्यामध्ये वाढ होत चालली आहे.
पिंपळनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथे तंटामुक्ती अभियानाला उदासिनता आल्यामुळे दिवसेंदिवस तंट्यामध्ये वाढ होत चालली आहे. पिंपळनेर परिसरात ५६ ग्रामपंचायती असुनही फक्त चार ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्र शासनाने गावपातळीवर निर्माण होणारे छोटे-मोठे तंटे, भांडणे मिटावीत, गावागावात शांतता अबाधीत रहावी यासाठी तंटामुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी तंटामुक्तीला प्रतिसाद आहे मात्र पिंपळनेर परिसरात या अभियानास उदासिनता आली असल्याचे समोर आले आहे. पिंंपळनेर पोलीस ठाण्यार्तंगत ७६ गावांचा समावेश होतो.
केवळ चारच ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला आहे. ५६ ग्रामपंचायतीमधुन या गावांचा कारभार चालत असुन यासाठी पिंपळनेर पोलीस ठाणे आहे.
ठाण्यात दोन अधिकारी व २५ कर्मचारी आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम राबविणे अनिवार्य आहे. त्यासाठी १५ आॅगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभेमध्ये समितची निवड केली जाते परंतु पोलिसांची या बाबतची उदासिनता, ग्रामस्थ, ग्रामसेवक व सरपंच यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने मोहिमेस उतरती कळा लागली आहे. पिंपळनेर परिसरातील ५६ ग्रामपंचायतीमधील गुंधावाडी, वलीपुर जवळा, पिंपळादेवी, वाक नाथापुर या चार ग्रामपंचायतिंनी ठराव दिले आहेत. इतर ग्रामपंचायतिंनी सहभाग घेतला नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आहेत.
या संर्दभात बोलताना पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शेख म्हणाले, ग्रामसेवकांनी ग्रामसभेचा प्रस्ताव देऊन सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ चार ग्रापंने ठराव दिला आहे. इतर ग्रा.पं.ना सुचना देण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)