आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी थायलंडच्या राजदूतांना प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 06:51 PM2019-03-11T18:51:34+5:302019-03-11T18:51:34+5:30
विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे.
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातर्फे थायलंडच्या राजदूतांना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव आता राजदूतांकडून वरिष्ठ पातळीवर जाणार असून, लवकरच त्यावर निर्णय होईल.
विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि तिरुपतीशी हवाईसेवेने जोडलेले आहे. गेल्या दीड वर्षापासून विमानसेवा वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी १६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली होती. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
थायलंडचे राजदूत चुटिन्टोन गोंगस्कडी यांची ८ मार्च रोजी भेट घेऊन डी. जी. साळवे यांनी औरंगाबादहून बँकॉक आणि आशियाई देशांना आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी प्रस्ताव सादर केला. यावेळी चुटिन्टोन गोंगस्कडी प्रस्तावाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. हा प्रस्ताव आता वरच्या पातळीवर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे डी. जी. साळवे यांनी सांगितले.
विमानतळ प्राधिक रणाकडून औरंगाबादहून विमानसेवा वाढविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एअर विस्ताराकडून विमानसेवा सुरूकरण्याची तयारी दर्शविली. त्यांच्याकडून विमानसेवा सुरू होण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळण्याची गरज आहे. हे पाठबळ मिळाल्यास आगामी कालावधीत औरंगाबादहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अजिंठा लेणींची प्रशंसा
चुटिन्टोन गोंगस्कडी यांनी जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणींची प्रशंसा केली. येथील कला, चित्रकलेचे कौतुक करीत त्यांनी हे सर्वकाही अद्भुत असल्याचे म्हटले.