राज्य शासनाने मंजूर केलेल्या ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:49+5:302021-06-22T04:05:49+5:30
औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्याने सुरू करण्यासाठीचे ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ...
औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्याने सुरू करण्यासाठीचे ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेटाळण्यात आले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने ४, तर व्यवस्थापन परिषदेने १ अशा पाच महाविद्यालयांची सकारात्मक शिफारस केली आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २३ फेब्रुवारीच्या बैठकीत निकषात बसणारे १५ प्रस्ताव सोडून उर्वरित २३८ कॉलेजचे प्रस्ताव फेटाळले होते. मात्र, विद्यापीठाचा विरोध पत्करून १६ मार्चला राज्य सरकारने सर्व प्रस्ताव मागवून घेत सरकारने विद्यापीठ कार्यक्षेत्रात ६६ कॉलेज मंजूर केली होती. यात बहुतांश महाविद्यालये राजकीय पुढाऱ्यांची होती. त्यापैकी ५७ प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने पुन्हा फेटाळले आहेत. केवळ ५ महाविद्यालयांची सकारात्मक शिफारस बैठकीत करण्यात आली. एका महाविद्यालयाने पुढील वर्षी सुरू करण्याची विनंती केली, तर ४ महाविद्यालयांनी प्रस्तावच दाखल केले नाही. व्यवस्थापन परिषदेने शिफारस केलेेल्या महाविद्यालयालाही यावर्षी केवळ कला व वाणिज्य शाळा, तर पुढील वर्षी विज्ञान शाखा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासह कंत्राटी कर्मचारी नियुक्ती, सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत किशोर शितोळे, डॉ. नरेंद्र काळे, राहुल म्हस्के, डॉ. फुलचंंद सलामपुरे, संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. जयसिंगराव देशमुख, सुनील निकम, प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट, कुलसचिव तथा सदस्य सचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह सर्व सदस्यांची उपस्थिती होती.
चौकट...
प्रशासकीय इमारतीसमोर शिवाजी महाराजांचा पुतळा
विद्यापीठात प्रशासकीय इमारतीसमोर सिटी बस स्थानक परिसरात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देण्यात आली .
चौकट...
पांडव यांच्या नियुक्तीवरून खडाजंगी
विद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रमेश पांडव यांच्या नियुक्तीवरून व्यवस्थापन परिषदेच्या बैठक सदस्यांची दीड तास खडाजंगी झाली. याप्रकरणी ठराव घेणे योग्य नसल्याचे म्हणत पुढील एका महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन कुलगुरुंनी दिल्यावर सभेचे कामकाज सुरळीत झाले.