पंचनामा करण्यास गेलेल्या पोलिसांसह फिर्यादी, साक्षीदारांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:54 PM2019-01-28T21:54:09+5:302019-01-28T21:54:22+5:30
मारहाणीच्या तक्रारीनुसार घटनास्थळाचा पंचनामा आणि साक्षीदारांची विचारपूस करणाऱ्या पोलीस जमादार व नाईकाला शिवीगाळ करून फिर्यादी कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे घडली.
औरंगाबाद : मारहाणीच्या तक्रारीनुसार घटनास्थळाचा पंचनामा आणि साक्षीदारांची विचारपूस करणाऱ्या पोलीस जमादार व नाईकाला शिवीगाळ करून फिर्यादी कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे २७ जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाऊसाहेब गायकवाड, सचिन गायकवाड, अमोल गायकवाड, रामूलाल ढोकळे, तीन महिला आणि दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, राजनगर येथील संगीता सर्व्हेल कांबळे यांच्या तक्रारीनुसार मुकुंदवाडी ठाण्यात २६ जानेवारी रोजी आरोपींविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुकुं दवाडी ठाण्यातील जमादार दिगंबर काटकर, पोलीस नाईक हगवणे हे २७ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता घटनास्थळी गेले.
पोलिसांनी कांबळे यांच्या घरात जाऊन पंचनामा केला. त्यानंतर ते साक्षीदारांची विचापूस करीत असताना भाऊसाहेब गायकवाड, सचिन गायकवाड, अमोल गायकवाड, ढोकळे यांच्यासह अन्य महिला पोलिसांसमोर कांबळे यांना म्हणाल्या की, तुम्ही पोलिसांत गुन्हा का दाखल केला? त्यानंतर त्यांनी अचानक संगीता कांबळे, त्यांचा पती सर्व्हेल कांबळे, मुलांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या घरावर दगडफेक केली आणि लाकडी दांड्याने हल्ला चढविला.
आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाºया पोलीस जमादार काटकर आणि नाईक हगवणे यांनाही त्यांनी शिवीगाळ केली. शिवाय त्यांनी कांबळे यांचा जिनाही तोडून टाकला. या घटनेनंतर जादा पोलीस बल तेथे दाखल होताच, हल्लेखोर तेथून पळून गेले. याप्रकरणी पोलीस जमादार काटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगल करून दहशत निर्माण करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.