प्रकुलगुरूंची नेमणूक होईना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:10 AM2017-12-31T00:10:13+5:302017-12-31T00:10:36+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरू पदासाठी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात तीन उमेदवारांची मुलाखत झाली होती. यास साडेतीन महिने उलटले आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन अद्यापही प्रकुलगुरूंच्या प्रतीक्षेतच आहे. या पदावर नेमणुकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींनी शिफारस केली. मात्र, राज्यपाल कार्यालय कोणालाही जुमानत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी बीसीयूडीऐवजी प्रकुलगुरूंना अधिकार देण्यात आले आहेत. बीसीयूडी हे पदच नवीन कायद्याने रद्द केले. यामुळे राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांना प्रकुलगुरू नेमणे बंधनकारक झाले होते.
राज्यातील काही विद्यापीठांमध्ये पूर्वीपासूनच प्रकुलगुरू कार्यरत होते. मात्र, ज्या विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरू नव्हते, अशा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी प्रकुलगुरूंची नेमणूक करण्यासाठी राज्यपालांकडे तीन नावांची शिफारस केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनीही तीन जणांची शिफारस केली.
या शिफारशीनुसार राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी १६ सप्टेंबर रोजी राजभवनात प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन, विभागप्रमुख डॉ. एस.जी. हिवरे आणि भूगर्भतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर दुसºयाच दिवशी प्रकुलगुरू निवडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यात भाजपशी संबंधित असलेल्या ‘अभाविप’चे कार्यकर्ते असलेले डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांच्या नेमणुकीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याचे समजते. यानंतर डॉ. तेजनकर यांच्या नावालाही सत्ताधारी गोटातून पसंती देण्यात आली. मात्र, अद्यापही त्याविषयी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.
प्रकुलगुरूंच्या नेमणुकीसाठी विधानसभ अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘एका’ उमेदवाराच्या नावाची शिफारस केली. या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही होकार कळविला असल्याचे समजते. तरीही प्रकुलगुरूंची नेमणूक होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेमणूक रखडलेले एकमेव विद्यापीठ
राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांमध्ये प्रकुलगुरूंची तात्काळ नेमणूक केली आहे. मात्र, केवळ औरंगाबादचेच विद्यापीठ या नेमणुकीपासून वंचित ठेवलेले आहे. मराठवाड्यातील लोकांना अन्याय सहन करण्याची सवय असल्यामुळे या दिरंगाईबद्दल कोणी ‘ब्र’शब्दसुद्धा काढलेला नाही. हे विशेष. ‘संघ’ विचाराचा एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे ही निवड रखडल्याचेही बोलले जाते. मात्र, यात विद्यापीठाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात आहे.