समृद्धीच्या बछड्यांचे अखेर नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:04 AM2021-09-22T04:04:17+5:302021-09-22T04:04:17+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिण समृद्धी हिने २५ डिसेंबर रोजी पाच बछड्यांना जन्म दिला होता. बछड्यांची नावे ठेवण्यासाठी ...
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील वाघिण समृद्धी हिने २५ डिसेंबर रोजी पाच बछड्यांना जन्म दिला होता. बछड्यांची नावे ठेवण्यासाठी नागरिकांकडून प्रस्तावही मागविण्यात आले होते. मात्र, नामकरण सोहळ्यासाठी मुर्हूत सापडत नव्हता. मंगळवारी सायंकाळी खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून बछड्यांचे नामकरण करण्यात आले.
प्राणीसंग्रहालय विभागाने यापूर्वीच नागरिकांना बछड्यांची नावे पाठवावीत,, असे आवाहन केले होते. त्यानुसार मनपाकडे तब्बल २०० नावे प्राप्त झाली. प्राप्त सर्व नावे एका डब्ब्यात टाकून सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. बछड्यांची नावे सुचविणाऱ्या नागरिकांचे नाव कंसात. जिजाई (सूचक - रामदास बोराडे), प्रतिभा (सूचक - विठ्ठलराव देवकर), वैशाली (सूचक - अथर्व चाबुकस्वार), रंजना (सूचक - कुसुम दिवाकर), रोहिणी (सूचक - पूर्वा पाटील). या नामकरण सोहळ्यानंतर खा. सुळे यांनी बछडे आणि वाघांची पाहणी केली. यावेळी वाघांचे केअर टेकर मोहम्मद जिया आणि एसबीआय बँकेने वाघ दत्तक घेतल्याबद्दल पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, बछड्यांना नाव देण्याची चांगली संधी दिल्याबद्दल प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचे आभार. पाण्डेय ज्या पद्धतीने शहराचा चेहरा मोहरा बदलत आहेत ते कौतुकास्पद आहे. यावेळी पाण्डेय यांच्यासह, पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) मोक्षदा पाटील, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता एस. डी. पानझडे, उपायुक्त सौरभ जोशी, प्रभारी प्राणीसंग्रहालय संचालक डॉ. शेख शाहेद, सेवानिवृत्त संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीसिंह चव्हाण, एसबीआय उपप्रबंधक दत्ता प्रसाद पवार आदींची उपस्थिती होती.