‘समृद्धी’ महामार्ग होण्याआधीच नामकरणाची चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:06 PM2018-11-21T23:06:10+5:302018-11-21T23:06:35+5:30
: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.
औरंगाबाद : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महामार्ग होण्याआधीच नामकरण करण्यासाठी विविध पक्षांची चढाओढ लागली आहे.
समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे. यातच भाजपच्या आमदारांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी केली. रस्ता कामाला सुरुवात होण्याअगोदरच नावावरून वादविवाद सुरू झाले आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना दिलेल्या निवेदनात अभिजित देशमुख यांनी म्हटले आहे की, विदर्भातील सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव यांच्या कन्या राजमाता जिजाऊ नंतर मराठवाड्यातील वेरूळला शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी म्हणून नांदायला आल्या. या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळख प्राप्त झाल्यास या महामार्गालाही एक भूषण प्राप्त होईल. खरं तर राजमाता जिजाऊ यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राला समृद्धी लाभत नाही. मग समृद्धी महामार्ग त्यांच्या नावाशिवाय कसा होईल. हा महामार्ग विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र-कोकण, मुंबई प्रांत यांना जोडणारा आहे. या सर्व विभागांना जोडणारा ऐतिहासिक दुवा हा जिजाऊ हाच आहे. यामुळे समृद्धी महामार्गाला राजामाता जिजाऊ यांचे नाव देणे अधिक संयुक्तिक ठरेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
महिलांचा सन्मान होईल
जिजाऊ यांचे नाव दिल्यास ज्या गौरवशाली इतिहासाचा महाराष्ट्राला आणि देशाला सार्थ अभिमान वाटतो, त्या परंपरेचे स्मरण यानिमित्ताने सदैव होत राहील. महाराष्ट्राचे मन, मनगट आणि मणका समृद्ध करणाऱ्या राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे नाव या महामार्गाला दिल्यास महिलांविषयी असलेल्या सन्मानाचे एक उदाहरण जगासमोर जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
------------