समृद्धी महामार्गाचे काम ‘ऑक्सिजन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:03 AM2021-04-23T04:03:56+5:302021-04-23T04:03:56+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शासनाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुरवठादारांनी सध्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ऑक्सिजनचा ...

Prosperity Highway work on ‘Oxygen’ | समृद्धी महामार्गाचे काम ‘ऑक्सिजन’वर

समृद्धी महामार्गाचे काम ‘ऑक्सिजन’वर

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शासनाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुरवठादारांनी सध्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबविला असून, या महामार्गावरील विविध पूल, अंडरपास, ओव्हरपास, इंटरचेंजच्या वेल्डिंगची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यातून गेलेला ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील एक लेन मेअखेर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) होते. त्यानुसार जिल्ह्यात या महामार्गाची कामे करणाऱ्या ‘मेगा इंजिनिअरिंग’ व ‘लार्सन अँड टुब्रो’ या दोन कंत्राटदार संस्था अहोरात्र काम करीत आहेत; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ही कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. सध्या या दोन्ही कंत्राटदार संस्थांकडे पाच हजार परप्रांतीय मजूर काम करीत होते. यापैकी होळीच्या सणानिमित्त यापैकी दोन हजार मजूर गावी निघून गेले. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढला आणि गावी गेलेले मजूर परत आलेच नाहीत. कामावर असलेल्या मजुरांमध्येही मोठी अस्वस्थता आहे; परंतु त्यांना या दोन्ही कंत्रादार संस्था, ‘एमएसआरडीसी’चे अधिकार दिलासा देत असून, त्यांची निवास, भोजन व आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

अलीकडे दहा दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या उड्डाणपूल, इंटरचेंजेस, अंडरपास, ओव्हरपाससाठी वेल्डिंगची कामे ऑक्सिजनअभावी मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. शासनाच्या आदेशानुसार स्थानिक पुरवठादार कंपन्यांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे तूर्तास ही कामे थांबली आहेत.

चौकट....

‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, गेल्या वर्षाचा आणि यंदाच्या लॉकडाऊनमुळे महामार्गाची कामे एक महिना मागे गेली आहेत. गेल्या वर्षी जिल्हा आणि राज्याच्या सीमा बंदी असल्यामुळे महामार्गाच्या कामासाठी लागणारे साहित्य बाहेरगावाहून आणणे अत्यंत कठीण झाले होते. यंदा तेवढी अवघड परिस्थिती नाही. ‘एल अँड टी’ ही कंत्राटदार संस्था कामामध्ये पुढे असून, ८७ टक्के, तर ‘मेगा’चे ६८ टक्के काम पूर्ण झाले आहे. होळीसाठी गावी गेलेले मजूर १५ दिवसांत परत येत असतात. पण, महिना झाला तरी ते अजून परत आले नाहीत. सध्या आहे त्या मजुरांची आम्ही काळजी घेत असून, त्यांनी गावी जाऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहोत.

चौकट.......

महिनाभरात बोगद्याचे काम

बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २९५ मीटर लांबीच्या बोगद्याच्या दोनपैकी एका लेनचे काम २२२ मीटर एवढे झाले आहे. सोबतच दुसऱ्या लेनचेही काम सुरू असून, ११० मीटर एवढे डोंगर कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे. ३० मेपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Prosperity Highway work on ‘Oxygen’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.