पैठण गेटच्या मुख्य बाजारपेठेतील लॉजमध्ये राजरोस वेश्या व्यवसाय उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 07:53 PM2024-08-30T19:53:53+5:302024-08-30T19:54:16+5:30
पाच तरुण अटकेत, पश्चिम बंगालच्या दोन महिलांची सुटका
छत्रपती संभाजीनगर : पैठण गेट परिसरातील अशोका लॉजमध्ये महिलांना डांबून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून पश्चिम बंगालच्या दोन महिलांची सुटका केली, तर व्यवस्थापक व पाच कर्मचाऱ्यांना अटक केली.
गेल्या काही दिवसांपासून मुख्य बाजारपेठेतील लॉजमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. स्थानिक व्यावसायिक, व्यापाऱ्यांमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. मात्र, पोलिसांना माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. उपायुक्त नितीन बगाटे यांच्या सूचनेनंतर पोलिसांनी डमी ग्राहकाला एक हजार रुपये देऊन सापळा रचला. बुधवारी रात्री १० वाजता डमी ग्राहकाने आत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आत प्रवेश केला. तेव्हा दोन खोल्यांमध्ये महिला दिसून आल्या. तीन ते पाच हजार रुपयांमध्ये त्यांच्याकडून देहविक्री करवून घेतली जात होती.
यांच्यावर गुन्हा दाखल
या कारवाईत लॉज व्यवस्थापक राजू सुभाष साळवे (वय २२, रा. नागसेन नगर), रिसेप्शनिस्ट विशाल सुरेश भुजंगे (३०, रा. भीमनगर), रुमबॉय भावेश प्रवीण जाधव (२०, रा. रामनगर, हर्सूल), इरफान गफार देशमुख (२८, रा. बीड), कामगार संदीप भिकाजी खाजेकर (२४, रा. सिद्धनाथ वडगाव, गंगापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
लॉजचा मालक कोण ?
पोलिस कारवाईनंतर गुन्हा दाखल करताना लॉज मालकाचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे लॉजचा मालक कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला.