छत्तीसगडहून आणलेल्या तरुणीला जुंपले वेश्या व्यवसायाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:37 PM2018-02-23T18:37:10+5:302018-02-23T18:40:02+5:30
एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील विलासपूर येथून आणलेल्या २० वर्षीय तरुणीला वेश्या व्यवसायाला जुंपल्याचा खळबळजनक प्रकार तिच्याच धाडसाने समोर आला.
औरंगाबाद : एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील विलासपूर येथून आणलेल्या २० वर्षीय तरुणीला वेश्या व्यवसायाला जुंपल्याचा खळबळजनक प्रकार तिच्याच धाडसाने समोर आला. पुंडलिकनगरातील एका खोलीत डांबलेल्या या तरुणीने गुरुवारी दुपारी कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि तिची आपबिती एका दुकानदाराला सांगितली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या घरी जाऊन दलालास चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
विकास मन्साराम हिमणे (२०, रा. मुकुंदनगर), असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. आंटी अन्नू ऊर्फ संगीता, अमन आणि दिवाकर मेश्राम यांचा आरोपींमध्ये समावेश असून ते पसार झाले. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विलासपूर येथील बेरोजगार तरुणी स्विटी (नाव बदलले) हिला गावातीलच दिवाकर मेश्राम याने औरंगाबादेतील एका एनजीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. एनजीओमध्ये अधिकारी असलेल्या अन्नू नावाच्या महिलेला त्याने विलासपूर येथे बोलावून घेतले. तेथे अन्नू आणि दिवाकर यांनी पीडितेच्या आईला चांगल्या नोकरीची आणि तिच्या सुरक्षेची हमी दिली आणि १७ फेब्रुवारीला रेल्वेने अन्नूसह ती औरंगाबादेत आली.
पुंडलिकनगरातील गल्ली नंबर २ मध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत पीडितेला ठेवण्यात आले. त्या खोलीत विकास आणि अमन हे दोन दलाल राहत. अन्नूने विकास हा तिचा भाऊ, तर अमन हा बहिणीचा मुलगा असल्याचे पीडितेला सांगितले. १७ रोजी रात्री दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. नंतर दुसर्या दिवशी ते तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तेथे पांढरा शुभ्र ड्रेस घातलेला आणि हातात व गळ्यात सोन्याचे ब्रासलेट आणि दागिने घातलेल्या एका व्यक्तीसोबत अन्नू मद्य प्राशन करीत होती. त्या व्यक्तीने आणि अन्य एकाने तिला हॉटेलमधील एका खोलीत नेऊन अत्याचार केला. दुसर्या दिवशी सकाळी तिला हॉटेलमधून पुन्हा पुंडलिकनगर येथील रूमवर नेऊन बंद करण्यात आले. तेथे आलेल्या एका जणाने स्वत: अन्नूचा पती असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार केला.
साईराज हॉटेलमध्ये सामूहिक अत्याचार
१९ रोजी रात्री आरोपींनी तिला साईराज हॉटेलमध्ये नेले. या हॉटेलमध्ये दत्ता नावाच्या व्यक्तीने आणि अन्य आठ ते दहा जणांनी पीडितेवर अत्याचार केला. विशेष म्हणजे शेजारच्या खोलीत आंटी अन्नू बसलेली होती. ती ग्राहकांकडून पैसे घेत होती.
पीडितेची प्रकृती बिघडल्यानंतरही अत्याचार
सलग पाच दिवसांपासून रात्रंदिवस सुरू असलेल्या अत्याचारामुळे पीडिता आजारी पडली. तिला थंडी वाजून ताप आल्यानंतर तिच्या सोबत राहणार्या विकासने तिला मेडिकलवरून एक टॅब्लेट आणून दिली. तिला टॅब्लेट खाऊ घातल्यानंतर आरोपींनी पुन्हा तिला शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे आधीच उपस्थित असलेल्या नराधामांच्या स्वाधीन केले. तेथे सहा ते सात जणांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला त्यांनी पुंडलिकनगर येथील खोलीत आणून डांबले.
...अशी केली तरुणीने स्वत:ची सुटका
गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विकास हा टॉयलेटला गेला होता, तर अमन हा ब्रश करीत होता. त्यांची नजर चुकवून पीडिता खोलीतून बाहेर पडली आणि गल्ली नंबर ३ मधील एका दुकानदाराकडे गेली. तिने ‘काका, मला वाचवा’, असे म्हणत टाहो फोडला. ‘ते लोक मला मारून टाकतील, मला मदत करा’, असे ती म्हणू लागली. आरोपीने तिचा मोबाईलही घेतल्याचे सांगितले. काही तरुणांनी या घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.ए. सिनगारे यांना कळविली. काही तरुणांनी पीडितेला सोबत घेऊन तिला डांबून ठेवलेल्या रूमवर धाव घेतली. अमन आणि विकासला त्यांनी चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. अमन तेथून पसार झाला. मात्र, विकासला लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपींनी पीडितेचा मोबाईलही घेतला
पीडितेने गावाहून आणलेला सुमारे दहा ते बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल आरोपींनी हिसकावून घेतला होता. ते तिला मोबाईल देत नसल्याने तिला आईशी संपर्क साधता आला नव्हता. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात आरोपींविरोधात बलात्कार, अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार आणि मारहाणीचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक सिनगारे हे तपास करीत आहेत.