जिल्हा परिषद शाळांना मनरेगाचे संरक्षण, सरंक्षक भिंती उभारण्यासाठी पालकमंत्र्यांचा हिरवा कंदील

By विजय सरवदे | Published: November 14, 2023 12:41 PM2023-11-14T12:41:21+5:302023-11-14T12:45:01+5:30

सरंक्षक भिंत उभारण्याच्या प्रतीक्षेत जिल्हा परिषदेच्या ९८० शाळा

Protection of MNREGA to Zilla Parishad schools, green light from parent minister to build protective walls | जिल्हा परिषद शाळांना मनरेगाचे संरक्षण, सरंक्षक भिंती उभारण्यासाठी पालकमंत्र्यांचा हिरवा कंदील

जिल्हा परिषद शाळांना मनरेगाचे संरक्षण, सरंक्षक भिंती उभारण्यासाठी पालकमंत्र्यांचा हिरवा कंदील

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद प्रशासनाने शाळांना संरक्षक भिंत, ग्रामपंचायत आणि अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, या प्रस्तावाला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सध्या तरी मनरेगा अंतर्गत ९८० शाळांना सरंक्षक भिंती उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

जिल्ह्यात जि.प.च्या २१०८ शाळा असून, यापैकी संरक्षक भिंती नसलेल्या ९८० शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार केली आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने ६१४ प्रस्ताव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाकडे सादर केले आहेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी केल्यानंतर ते मंजुरीसाठी पाठविले जातील, असे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अलीकडे जिल्हा परिषद शाळा परिसरात ग्रामस्थांकडून अतिक्रमणे होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्रीच्या वेळी गावातील काही टवाळखोर मंडळीच्या शाळेच्या आवारात दारूच्या पार्ट्याही चालतात. शाळांच्या आवारातील भौतिक सुविधांची नासधूस केली जात आहे. सरंक्षक भिंत नसल्यामुळे शाळा परिसरात जनावरांचा मुक्त संचार असतो. शाळांतील महत्त्वाचा दस्तावेजही रामभरोसेच आहे. त्यामुळे शाळांना सरंक्षक भिंत उभारणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाकडून निधी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे सध्या तरी मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या विनंतीनुसार पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सरंक्षक भिंत उभारण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार मीना यांनी शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या ९८० शाळांना या भिंती उभारण्याची गरज असून, त्यानुसार नियोजन केले जात आहे.

आकडे बोलतात
तालुका- संरक्षक भिंत आवश्यक शाळा- प्राप्त प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर- १४४- ८० फुलंब्री- २३-३२
सिल्लोड- १४९-११०
सोयगाव- २६-२५
कन्नड- १४४-८४
खुलताबाद- ३६-०९
गंगापूर- १५०- ९३ वैजापूर- १९०- ७२ पैठण- ११८- १०९

Web Title: Protection of MNREGA to Zilla Parishad schools, green light from parent minister to build protective walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.