..म्हणे स्वसंरक्षणासाठी २० हजारांत विकत घेतला गावठी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:21 PM2019-04-11T23:21:10+5:302019-04-11T23:21:29+5:30
वाहनचालक म्हणून काम करीत असताना रात्री उशिरापर्यंत प्रवास करावा लागतो, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी शिर्डी येथे एका मध्यस्थामार्फत २० हजार रुपयांत आठ महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील एक जणाकडून गावठी पिस्तूल खरेदी केल्याची कबुली जीम ट्रेनरवर पिस्तुलातून गोळी झाडणाºया शहादेव महादेव सोनवणे याने दिली.
औरंगाबाद : वाहनचालक म्हणून काम करीत असताना रात्री उशिरापर्यंत प्रवास करावा लागतो, त्यामुळे स्वसंरक्षणासाठी शिर्डी येथे एका मध्यस्थामार्फत २० हजार रुपयांत आठ महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील एक जणाकडून गावठी पिस्तूल खरेदी केल्याची कबुली जीम ट्रेनरवर पिस्तुलातून गोळी झाडणाºया शहादेव महादेव सोनवणे याने दिली. जीम ट्रेनरवर गोळी झाडल्याप्रकरणी अटकेतील दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.
गारखेड्यातील जीम ट्रेनर अलीम शेख यांच्यावर किरकोळ वादातून बुधवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास आरोपी शहादेव सोनवणे याने अन्य आरोपी जितेंद्र वसंत राऊत आणि सलीम याच्या मदतीने गावठी पिस्तुलातून गोळी झाडून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पिस्तूल हाफ लॉक झाल्याने अलीम वाचला होता. याप्रकरणी पोलिसांनी शहादेव आणि जितेंद्रला बुधवारी दुपारीच अटक करून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले होते. या दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली. दरम्यान पोलीस चौकशीदरम्यान शहादेवने पोलिसांना सांगितले की, तो टॅक्सी कारवर वाहनचालक म्हणून काम करतो. रात्री- बेरात्री त्याला प्रवास करावा लागतो. स्वत:च्या आणि प्रवाशांच्या संरक्षणासाठी त्याने आठ महिन्यांपूर्वी शिर्डी येथे एका मध्यस्थामार्फत मध्यप्रदेशातील एक जणाकडून २० हजार रुपयांत हे गावठी पिस्तूल खरेदी केल्याचे सांगितले. आरोपी शहादेव विरोधात यापूर्वी मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. असे असले तरी त्याने या गावठी पिस्तूलचा यापूर्वी कोठे वापर केला आहे का, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. या पिस्तुलातून यापूर्वी कधी गोळीबार झालेला आहे का, हेदेखील तपासले जाणार आहे. अलीमवर गोळी झाडताना आरोपीसोबत असलेला सलीम हा पसार झालेला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
चौकट
आरोपींना रात्री झाली होती मारहाण
आरोपी शहादेव आणि त्याच्या मित्रांना जीम ट्रेनर आणि त्याच्या साथीदारांनी मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथे मारहाण केली होती. या मारहाणीनंतर शहादेव आणि त्याचे साथीदार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. ठाणे अंमलदारांनी त्यांना मेडिकल मेमो देऊन उपचारासाठी घाटी रुग्णालयात जा, उपचार करून आल्यानंतर तुमची तक्रार नोंदवू असे सांगितले. यानंतर त्यांनी घाटीत जाऊन उपचार घेतल्याचे समोर आले.
--------------