अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:10 IST2025-03-07T14:08:57+5:302025-03-07T14:10:11+5:30
पोलिस पॉक्सो कलमाची वाढ करणार; महिलेवर हल्ल्यानंतर विकृताने रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले, पोलिसांनी राख जप्त केली

अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा प्रयत्न करून ३६ वर्षीय विवाहितेच्या संपूर्ण शरीरावर धारदार चाकूने वार करणाऱ्याची नवी विकृती समोर आली आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (१९, रा. घारदोन) याने त्याच्या मोबाइलमध्ये घटनेच्या पंधरा दिवस आधी गावातील बालकाचे नग्नावस्थेतले फोटो काढण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण त्याच्या घरापर्यंत पोहोचलेही होते. तरीही, त्याने पंधराच दिवसाच्या आत थेट महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले.
२ मार्च रोजी घारदोन परिसरातील घटनेने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. अभिषेकने शेतात काम करणाऱ्या एका विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने त्यास विरोध करून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याने धारदार चाकूने तिच्या संपूर्ण शरीरावर चेहरा, पोट, मान, हात, डोक्यात चाकूने सपासप वार करून पाेबारा केला. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सद्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच निरीक्षक रविकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडित, अंमलदार विक्रम जाधव, सचिन रत्नपारखे व इखारे यांनी चोवीस तासांत त्याला अटक केली.
बाहेरून भोळा, आतून विकृत
बारावी नापास अभिषेक शेतीचे काम करतो. गावात कायम देवभक्त, भोळेपणाचा आव आणणाऱ्या अभिषेकचा खरा चेहरा समोर आल्याने त्याच्या गावकऱ्यांसह समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी शिवेसेनेच्या महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे अभिषेकवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले. अशा घटना समाजासाठी लज्जास्पद आहेत. अशा क्रूरकर्म्याला भरचौकात फासावर लटकवा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
पॉक्सो कलम वाढवणार
पंधरा दिवसांपूर्वी त्याने गावातील एका घरासमोर खेळणाऱ्या बालकाचे मोबाइलमध्ये फोटो काढले होते. बालकाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर संतप्त कुटुंबाने त्याला चांगलेच सुनावले होते. त्याच्या कुटुंबालादेखील ही बाब कळाली होती. मात्र, तरीही त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. तपास पथकाने त्याचा मोबाइल जप्त करून सायबर पोलिस व फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पंचासमक्ष तपासण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचे (पॉक्सो) कलम वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रक्ताचे कपडे जाळले
महिलेवर अमानवीरीत्या हल्यात अभिषेकच्या कपड्यांना रक्त लागले हाेते. घराच्याच मागे त्याने ते कपडे पाळा पाचोळा टाकून जाळून टाकले. चिकलठाणा पोलिसांनी कपड्यांची राख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गुरुवारी जप्त केली.