'अमेरिकेतून येत कसा नाही, आलाच पाहिजे'; पतीसाठी पत्नीचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:47 AM2020-01-14T10:47:18+5:302020-01-14T10:53:19+5:30
सासरची मंडळी वारंवार घरात कोंडून ठेवतात. मानसिक त्रास देतात. तसेच पतीशी संपर्क होऊ देत नसल्याचा आरोप प्राजक्ता यांनी केला आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील वैजापूर येथील महिलेने पतीला भेटू- बोलू दिले जात नसल्याने चक्क सासरची मंडळीच्या सराफा दुकानासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले असल्याचे पाहायला मिळाले. विदेशात नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या पतीसोबत सासरची मंडळी कुठलाही संपर्क करू देत नसल्याचे आरोप पीडित महिलेने केला आहे.
वैजापूर येथील सराफ सचिन उदावंत यांचा मुलगा सत्यजित यांच्याशी प्राजक्ता डहाळे यांचा विवाहा गेल्यावर्षी झाला होता. सत्यजित हे अमेरिकेत वास्तव्यास असून ते तेथे नोकरी करतात. विवाहानंतर चार महिने प्राजक्ता ह्या सुद्धा अमेरिकेत पती सत्यजित सोबत राहिल्या. मात्र नोव्हेंबर २०१८ पासून सत्यजित हे त्यांना वैजापूर येथे सोडून परत अमेरिकेत गेले. मात्र तेव्हापासून त्यांनी पत्नीशी संपर्क केला नाही.
तर सासरची मंडळी वारंवार घरात कोंडून ठेवतात. मानसिक त्रास देतात. तसेच पतीशी संपर्क होऊ देत नसल्याचा आरोप प्राजक्ता यांनी केला आहे. त्यामुळे पती भारतात परत घरी येईपर्यंत वैजापूर येथील दुकानासमोर प्राजक्ता ह्यांनी उपोषण करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या उपोषणाला स्थानिक लोकांनी सुद्धा पाठींबा दर्शवला आहे. तर 'अमेरिकेतून येत कसा नाही, आलाच पाहिजे' अशे फलक हातात घेऊन प्राजक्ता आणि त्यांच्या माहेरच्यांनी सोमवारी उपोषण केले.
अखेर वैजापूरचे प्रभारी तहसीलदार महेंद्र गीरगे यांनी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. त्यांनतर त्यांनी सासरची मंडळी यांच्यासोबत चर्चा करून येणाऱ्या 13 तारखेपूर्वी मुलगा सत्यजित परत येणार असल्याचे लेखी आश्वासन लिहून घेतले. त्यामुळे तोपर्यंत उपोषण मागे घेण्याची भूमिका प्राजक्ता यांनी घेतली आहे.