छत्रपती संभाजीनगरात २१ ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषण
By सुमित डोळे | Published: November 1, 2023 06:30 PM2023-11-01T18:30:37+5:302023-11-01T18:31:12+5:30
सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द, लोकप्रतिनिधींच्या घराला कडेकोट बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून खबरदारी घेणे सुरू केले. शहरात विविध २१ ठिकाणी मराठा बांधवांकडून आंदोलन करण्यात आले. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून लोकप्रतिनिधींच्या घराला कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीड, माजलगावमध्ये झालेल्या जाळपोळीनंतर राज्यात सर्वत्र पोलिस यंत्रणा सतर्क झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अंमलदारापर्यंत सर्वांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. सोमवारी सायंकाळपासूनच सुटीवर गेलेल्या पाेलिसांना पुन्हा कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या. गुप्तचर यंत्रणांसह गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून मराठा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्क करणे सुरू केले. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस रात्रभर सर्वत्र जातीने लक्ष ठेवून होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी उपायुक्त नितीन बगाटे यांनी आयुक्तालयात मराठा आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. शांततेच्या मार्गाने, पोलिसांना विश्वासात घेऊन आंदोलन करा. वरिष्ठांनी तरुणांना त्यासाठी मार्गदर्शन करावे, असे ते म्हणाले. बैठकीनंतर उपस्थित मराठा आंदोलनकर्त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, विशेष शाखेचे अशोक भंडारे, प्रा. चंद्रकांत भराड, सुनील कोटकर, सुकन्या भोसले, कमलाकर जगताप, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, डॉ. दिव्या पाटील, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, नीलेश ढवळे, सचिन अवळे, विजय वाघचौरे उपस्थित होते.
सुसंवाद आणि समन्वय
शहरात सर्व आंदोलन हे शांत पद्धतीने सुरू आहे. आम्ही आंदोलनकर्त्यांसोबत सुसंवाद, समन्वय ठेवून आहोत. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. सोशल मीडियावरील अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये.
- मनोज लोहिया, पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.