कचरा टाकण्यास औरंगाबाद परिसरातून विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:00 PM2018-03-15T13:00:56+5:302018-03-15T13:01:17+5:30
शहरात २५० ठिकाणी कचचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हा कचरा कुठेही नेऊन टाकण्याचा प्रयत्न मनपा अधिकारी व कर्मचारी मागील दोन-तीन दिवसांपासून करीत आहेत.
औरंगाबाद : शहरात २५० ठिकाणी कचचे मोठमोठे डोंगर साचले आहेत. हा कचरा कुठेही नेऊन टाकण्याचा प्रयत्न मनपा अधिकारी व कर्मचारी मागील दोन-तीन दिवसांपासून करीत आहेत. हिमायतबाग येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने बुधवारी बरेच प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरही असाच प्रयोग करण्याचे ठरविले असले तरी समिती हिरवी झेंडी दाखवायला तयार नाही. आज गांधेली येथे एका खाजगी व्यक्तीच्या जागेची पाहणी करण्यात येणार आहे.
शहरातील कचरा प्रश्नात मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना पुढे येत आहेत. व्यापारी महासंघाने कॅरिबॅग बंदीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मनपाला दिले. काही संस्थांनी रिक्षा, घंटागाड्या देण्याची तयारीही दर्शविली. गांधेली व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी खाजगी जागा बघावी, असे निमंत्रण दिले आहे. या जागांची पाहणीही आज मनपा करणार आहे.
हर्सूल सावंगी येथे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ बुधवारी कचरा पुरण्यात आला. याला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला असून, एकाच पावसात सर्व कचरा विहिरीत जाईल, पिण्याचे पाणी दूषित होईल, असा आरोप करण्यात आला आहे. हर्सूल तलाव परिसरातील जांभूळवन येथेही कचरा टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री टी.व्ही. सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यानात लपून छपून कचरा पुरण्यात येत होता.