कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलकांनी जनशताब्दी एक्स्प्रेस रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:43 PM2021-02-18T18:43:05+5:302021-02-18T18:43:43+5:30
Farmers Protest याप्रकरणी पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
लासूर स्टेशन ( औरंगाबाद ) : नवीन कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी किसान सभा व लालबावटा शेतमजूर युनियनच्या आंदोलकांनी गुरुवारी सकाळी रेल्वेरोकोआंदोलन केले. लासूर स्टेशन येथे आंदोलकांनी जनशताब्दी एक्सप्रेस अडवून केंद्र सरकारचा निषेध केला. याप्रकरणी पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार आज देशव्यापी रेल रोको आंदोलनाचा भाग म्हणून किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन ,भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जनआंदोलन संघर्ष समितीच्यावतीने लासूर स्टेशन येथे रेलरोको आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजेपासून किसान सभा व शेतमजूर युनियनच्या आंदोलकांनी रेल्वे स्टेशनवर निदर्शने सुरू केली होती. जनशताब्दी एक्सप्रेस लासूर स्टेशनला येताच तिच्यासमोर रूळावरच आंदोलकांनी ठिय्या मांडला. नवीन कृषी कायदे रद्द करा, किमान आधारभूत भावाचा नवीन कायदा करा, राशन व्यवस्था वाचवा, दिल्ली येथील किसान आंदोलकांवरील दडपशाही थांबवा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या. पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेऊन रूळ रिकामा केला.
आंदोलनात लासूर स्टेशन, गाजगाव, खादगाव, देरडा ,धामोरी, कोपरगाव ,गोळवाडी, दहेगाव,सिंधी सिरजगाव,कलीम टाकळी या दहा गावातील किसान सभा व शेतमजूर युनियनचे कार्यकर्ते सहभागी होते. आंदोलनाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय पंच सदस्य कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, किसान सभेचे जिल्हा सचिव कैलास कांबळे, जिल्हा धरणग्रस्त समितीचे भाऊसाहेब शिंदे किसान सभेचे गंगापुर तालुका पुढारी विलास शेंगुळे व सुरेश शेंगुळे महाराज, दौलतराव मोहिते, दत्तू काळवणे यांनी केले. आंदोलनात रूपचंद हिवाळे, जालिंदर धुमाळ, ज्ञानेश्वर गवळी, मच्छिंद्र धुमाळ ,फकीरचंद जाधव राजू जाधव ,किशोर पवार, लक्ष्मणराव तुपे, ज्ञानेश्वर कांबळे अनिल जाधव सुनील थोरात अंकुश, अंकुश लिंगायत, संतोष कांबळे ,संतराम कांबळे, ज्ञानेश्वर हिवाळे, गणेश कळसकर, कळसकर,कडू पाटील, कडू पाटील, अब्बु पठाण, दिगंबर वाघचौरे रामकिसन वाघचौरे, प्रीतम शिंदे आदींचा सहभाग होता.