नारायण राणे, अनिल बोंडेविरोधात मराठा समाजाची क्रांतीचौकात जोरदार निदर्शने
By बापू सोळुंके | Published: August 5, 2024 10:23 PM2024-08-05T22:23:18+5:302024-08-05T22:23:39+5:30
खासदार नारायण राणे आणि खा. अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या खासदार नारायण राणे आणि खा.अनिल बोंडे विरोधात सकल मराठा समाजाच्यवातीने सोमवारी सायंकाळी क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली.
खासदार नारायण राणे आणि खा. अनिल बोंडे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. शहरातील संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खा.राणे आणि खा. बोंडेविरोधात निदर्शने करीत संताप व्यक्त केला. एक मराठा, लाख मराठा, नारायण राणे हाय, हाय, अनिल बोंडे हाय, हाय, आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं, राणे आणि बोंडे यांचा निषेध असो अशा घोषणा देत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी क्रांतीचौक दणाणून सोडला.
या आंदोलनात सुनिल कोटकर, निलेश ढवळे,अरुण नवले, राजु ढेरे, रेखा वाहटुळे, अशोक वाघ, नितीन कदम, प्रा.वाघ , किशोर ठुबे, सतिष जगताप, ज्ञानेश्वर कनके, उदय गायकवाड आदींसह समाज बांधवांनी सहभाग नोंदविला.