अभिमानास्पद! चंद्रयान-३ उड्डाणाच्या टीममध्ये छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र
By राम शिनगारे | Published: August 24, 2023 11:43 AM2023-08-24T11:43:52+5:302023-08-24T12:07:31+5:30
बारावीपर्यंतचे शिक्षण शहरात, इस्रोमध्ये गिरवले अभियांत्रिकीचे धडे
छत्रपती संभाजीनगर :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चंद्रयान-३ मोहिमेला प्रचंड यश मिळाले. विक्रम लँडर हे यान चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वीपणे लँड करण्यात आले, अशी कामगिरी करणारा भारत जगातील एकमेव देश ठरला. या अभिमानास्पद कामगिरीमध्ये छत्रपती संभाजीनगरातील जेसल दीपक कोटक (रा. गारखेडा) या २५ वर्षीय युवा शास्त्रज्ञाचा समावेश आहे. ही शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून चंद्रयान-३ चे १४ जुलै रोजी दुपारी २:३५ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले होते. या रॉकेटने १ लाख किलोमीटरपर्यंत ठरवून दिलेल्या कक्षेत विक्रम लँडरला यशस्वीपणे पोहोचविल्यानंतर हे रॉकेट समुद्रामध्ये पाडण्यात आले. या रॉकेट प्रक्षेपणाच्या टीममध्ये जेसल कोटक या युवा शास्त्रज्ञाचा समावेश होता. जेसल दोन वर्षांपूर्वीच इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. त्यांना पहिल्या दिवसापासून चंद्रयान-३ च्या मोहिमेवर काम करण्याची संधी मिळाली. चंद्रयान-३ मोहिमेची सुरुवातच रॉकेटमधून विक्रम लँडर पाठविण्यापासून झाली. रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी कामगिरीमुळे हा ऐतिहासिक दिवस भारतीयांना पाहता आला. त्याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया जेसल कोटक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
'आयआयटी' सोडून 'आयआयएसटी'त प्रवेश
जेसल कोटक यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शहरातील स्टेपिंग स्टोन हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी स.भु. कनिष्ठ महाविद्यालयातून घेतले. जेसल यांचा नंबर आयआयटीमध्ये लागत होता. मात्र, त्यांना इस्त्रोच्या भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, त्रिवेंद्रम (आयआयएसटी) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. तेथे प्रवेश घेऊन दोन वर्षांपूर्वी त्यांनी ते पूर्ण केले. त्यानंतर ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर, त्रिवेंद्रम येथे शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले व चंद्रयान-३ मोहिमेचा भाग बनले.
मनस्वी अभिमान वाटतो
चंद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरली. भारतीय शास्त्रज्ञांनी जशी कागदावर योजना तयार केली. जशास तशी योजना प्रत्यक्षात उतरवली. ही अतिशय अभिमानास्पद आणि ऐतिहासिक अशी कामगिरी आहे. या मोहिमेत भाग घेता आला. त्याचा मनस्वी अभिमान वाटतो.
-जेसल कोटक, युवा शास्त्रज्ञ, इस्रो