अभिमानास्पद ! देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ४६ व्या स्थानी

By राम शिनगारे | Published: August 13, 2024 12:15 PM2024-08-13T12:15:12+5:302024-08-13T12:17:10+5:30

केंद्र शासनाकडून काही वर्षांपासून ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रॅंकिंग जाहीर केली जात आहे.

Proud! Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ranked 46th in the country in NIRF ranking | अभिमानास्पद ! देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ४६ व्या स्थानी

अभिमानास्पद ! देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ४६ व्या स्थानी

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या रँकिंगमध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने देशात ४६ वा, तर राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी विद्यापीठाला पहिल्या १०० मध्येही स्थान मिळाले नव्हते, हे विशेष. केंद्र शासनाकडून १०० कोटी रुपये मिळाल्यानंतर ही एक मोठी उपलब्धी विद्यापीठास प्राप्त झाली आहे.

केंद्र शासनाकडून काही वर्षांपासून ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रॅंकिंग जाहीर केली जात आहे. ही रँकिंग शैक्षणिक संस्थांच्या १६ प्रकारांमध्ये जाहीर केली जाते. एकूण सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मद्रासच्या इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या गटामध्ये चेन्नई येथील अन्ना विद्यापीठाने प्रथम क्रमांक, तर दुसऱ्या स्थानी कोलकाता येथील जाधवर विद्यापीठाने बाजी मारली. तिसऱ्या स्थानी पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला स्थान मिळाले. १८ व्या स्थानी मुंबई विद्यापीठ, ३३ व्या स्थानी सीओईपी विद्यापीठ पुणे आणि ४६ व्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बाजी मारली. राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या ५० विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील चार विद्यापीठांचाच समावेश झाला आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या नेतृत्वात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. गुलाब खेडकर यांनी विविध विभागांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये आल्याचे स्पष्ट झाले.

वाय. बी. चव्हाण फार्मसी ७६ व्या स्थानी
फार्मसी गटामध्ये मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या वाय. बी. चव्हाण फार्मसी महाविद्यालयाने देशभरातील फार्मसी संस्थांमध्ये ७६ वे स्थान मिळवले आहे. मागील अनेक वर्षांपासून हे महाविद्यालय पहिल्या १०० मध्ये येण्याची किमया करीत आहे.

सामूहिक प्रयत्नातून विद्यापीठाला पुढे नेण्याचा प्रयत्न
एनआयआरएफच्या रॅंकिंगमध्ये विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये आले. याचा निश्चितच आनंद आहे. दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात आपले विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये आणण्याचे उद्दिष्ठ ठरवले होते. त्यानुसार विद्यापीठाने कामगिरी बजावली आहे. यापुढेही विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा याबाबतीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आहे. अंतर्गत गुणवत्त हमी कक्षातील सर्वांनीच उत्तम प्रकारे नियोजन केले. आगामी काळातही सामूहिक प्रयत्नातून विद्यापीठाला पुढे नेण्याचा प्रयत्न असेल.
- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू

Web Title: Proud! Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ranked 46th in the country in NIRF ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.