अभिमानास्पद! छत्रपती संभाजीनगरच्या प्राजक्ता, ऋचा यांचे प्रजासत्ताकदिनी राजपथावर भरतनाट्यम
By बापू सोळुंके | Published: January 25, 2024 05:43 PM2024-01-25T17:43:59+5:302024-01-25T17:44:50+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारच्यावतीने ‘वंदे भारतम्’ या राजपथावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने २६ जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्लीतील राजपथावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरमधील कलावंत प्राजक्ता राजूरकर आणि ऋचा देशमुख यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.
या दोघी देश, विदेशातील प्रमुख अतिथींसमोर भरतनाट्यम सादर करणार आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारच्यावतीने ‘वंदे भारतम्’ या राजपथावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात देशातून अनेक कलाकार आपली कला सादर करतात. महाराष्ट्रातून यावर्षी पुणे येथील कलावर्धिनी संस्थेची निवड झाली आहे. यात आठ नृत्यांगणा भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथील ध्यास परफॉरमिंग आर्ट्समध्ये शिकलेल्या केतकी नेवपूरकर यांच्या शिष्या प्राजक्ता राजूरकर आणि ऋचा देशमुख यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. शहरासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे नेवपूरकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन्ही कलावंत २५ डिसेंबरपासून दिल्लीत तयारी करीत आहेत.